विद्यार्थ्यांची शुल्क माफी अडचणीत
By Admin | Updated: January 6, 2015 01:13 IST2015-01-06T00:50:50+5:302015-01-06T01:13:19+5:30
औरंगाबाद : शासनाकडून गारपीटग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच अन्य शुल्क माफीची रक्कम मिळविण्यास विद्यापीठासमोर अडचण निर्माण झाली आहे.

विद्यार्थ्यांची शुल्क माफी अडचणीत
औरंगाबाद : शासनाकडून गारपीटग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच अन्य शुल्क माफीची रक्कम मिळविण्यास विद्यापीठासमोर अडचण निर्माण झाली आहे. सर्व संलग्नित महाविद्यालयांना सात दिवसांच्या आत विद्यार्थ्यांची यादी पाठविण्याच्या लेखी सूचना केल्यानंतरही एकानेही महिना झाला तरी आजपर्यंत यादी पाठविण्याचे औदार्य दाखवलेले नाही.
मावळत्या वर्षाच्या सुरुवातीला मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्हे गारपिटीने झोडपले होते. परिणामी, हातातोंडाशी आलेले पीक व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. ही बाब गांभीर्याने घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने मागील शैक्षणिक वर्षामध्ये विद्यापीठात शिकणारे तसेच संलग्नित महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क आणि वसतिगृह शुल्क माफीची भूमिका घेतली होती. एवढा मोठा शुल्क माफीचा बोजा हे विद्यापीठ स्वबळावर उचलू शकत नसल्यामुळे प्रशासनाने शासनाकडे शुल्क माफीची रक्कम मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यापीठाला जुलै महिन्यात पत्र पाठवून गारपीटग्रस्त विद्यार्थ्यांची यादी पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या.