मुंडेंना श्रद्धांजली
By Admin | Updated: June 4, 2014 00:45 IST2014-06-04T00:43:50+5:302014-06-04T00:45:33+5:30
नांदेड : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे़
मुंडेंना श्रद्धांजली
नांदेड : केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळे जिल्ह्यात शोककळा पसरली आहे़ मुंडे यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांमध्ये पोरके झाल्याची भावना व्यक्त होत असून सामान्य माणूस, शेतकरीही या घटनेने हेलावला आहे़ मुंडे यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर अनेकांना यावर विश्वासच बसत नव्हता़ आपला नेता असा अचानक आपल्यातून निघून गेला ही कल्पनाही सहन न होणारी होती़ मुंडे यांना शहरात ठिकाठिकाणी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली़ जुना मोंढा येथे झालेल्या श्रद्धांजली सभेत भाजपा नेते व कार्यकर्त्यांनी अभिवादन केले़ यावेळी भाजपाचे जिल्हा कार्याध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी खा़ डी़ बी़ पाटील, चैतन्यबापू देशमुख, प्रवीण साले, अरुंधती पुरंदरे, डॉ़ शोभा वाघमारे, दिलीपसिंघ सोडी, शीतल खांडील आदी उपस्थित होते़ तरोडा चौक, सिडकोतही भाजपा कार्यकर्त्यांतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली़ भाजपा नेते गोपीनाथराव मुंडे आता ग्रामविकासमंत्री म्हणून महाराष्ट्रासाठी मोठे योगदान देवू शकले असते़ त्यांच्या अकाली निधनाने मराठवाड्यासह राज्याचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी दिली़ ते म्हणाले, मराठवाड्यातील प्रश्नांची जाण असणारे गोपीनाथराव मुंडे अनुभवी नेतृत्व होते़ सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते उच्चपदापर्यंत त्यांची वाटचाल संघर्षमय राहिली़ यापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी मोठे योगदान दिले होते़ हे कोणीही विसरू शकत नाही, असे ते म्हणाले़