पारध परिसरात वृक्षतोड सुरुच; वनविभागाचे होतेय दुर्लक्ष...!
By Admin | Updated: March 10, 2016 00:40 IST2016-03-10T00:24:32+5:302016-03-10T00:40:06+5:30
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरात वृक्ष लागवडऐवजी वृक्षतोड जोरात सुरू आहे. यानिमित्ताने पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे चित्र आहे.

पारध परिसरात वृक्षतोड सुरुच; वनविभागाचे होतेय दुर्लक्ष...!
पारध : भोकरदन तालुक्यातील पारध आणि परिसरात वृक्ष लागवडऐवजी वृक्षतोड जोरात सुरू आहे. यानिमित्ताने पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे चित्र आहे.
एकीकडे प्रशासन ‘झाडे लावा, झाडे जगवा’ मंत्र जपायला सांगते तर वृक्षतोड करणारे वृक्षांच्या मुळावर सर्रासपणे कुऱ्हाड चालवित असल्याचे विदारक चित्र आहे. दरवर्षी वृक्ष लागवडीवर लाखो रुपये खर्ची पडत आहेत.
दरम्यान, या प्रकारामुळे पारध परिसरातील वनराई संपुष्टात येण्याची भिती वृक्षप्रेमींतून व्यक्त होत आहे. या परिसरात १० ते १५ वर्षांपूर्वी चिंच, बाभळ, लिंब, चंदन या वृक्षांच्या ताट्याच्या ताट्या उभ्या होत्या. परंतु आता येथील वनराईत किती वृक्ष आहे, असा प्रश्न विचारला तर याचे उत्तर वनविभाग देऊ शकेल की नाही, याबाबत साशंकता आहे.
परिसरातील वनराईत सर्रासपणे वृक्षतोड सुरु आहे. वनखात्याकडून आंबा, लिंब या झाडांच्या तोडीची परवानगी मिळतेच कशी, असा प्रश्न वृक्षप्रेमींतून केला जात आहे. या वृक्षतोडीचे दुष्परिणाम सगळीकडे जाणवत असताना वृक्षतोड थांबत का नाही, असेही वृक्षप्रेमी विचारतात. या परिसरातील वनराईत गेल्या १० ते १५ वर्षांपासून सततच्या वृक्षतोडीमुळे वृक्षांची संख्या अवघ्या २० ते २५ टक्क्यांवर येऊन ठेपल्याचे दिसून येते. एकीकडे प्रशासन ‘इको व्हिलेज’ ही संकल्पना राबवित आहे. गावोगावी हरित सेनेद्वारे वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती सुरु आहे. यावर लाखो रुपये खर्च केले जातात. तर दुसरीकडे अधिकारी, कर्मचाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे या वृक्षतोडणाऱ्यांची हिम्मत वाढत आहे. शासकीय यंत्रणा आपल्या कार्यालयात बसून वनातील निर्णय घेतात. त्याचा फायदा घेत लाकूडतोडे विजेची चोरी करुन कटर मशिनच्या सहाय्याने मोठमोठी वृक्ष क्षणार्धात जमीनदोस्त करुन वाहनांच्या सहाय्याने रात्रीतून रवाना करतात. या प्रक्रियेत वनविभाग, पोलिस यंत्रणा व महावितणची मिलीभगत असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींतून होत आहे. बरेच लाकूड व्यापारी एखाद-दुसऱ्या झाडाच्या तोडीची परवानगी संबंधित विभागाकडून घेतात व त्या नावाखाली सर्रास २० ते २५ झाडांची कत्तल केली जात आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.