जामा मशीदमध्ये झाड कोसळून प्राध्यापक ठार
By Admin | Updated: May 6, 2016 23:58 IST2016-05-06T23:43:27+5:302016-05-06T23:58:48+5:30
औरंगाबाद : शहरातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक जामा मशीदमध्ये शुक्रवारी सायंकाळी अचानक एक मोठे झाड कोसळले. या दुर्दैवी अपघातात मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सय्यद जावेद कबीर गंभीर जखमी झाले.

जामा मशीदमध्ये झाड कोसळून प्राध्यापक ठार
औरंगाबाद : शहरातील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक जामा मशीदमध्ये शुक्रवारी सायंकाळी अचानक एक मोठे झाड कोसळले. या दुर्दैवी अपघातात मौलाना आझाद महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सय्यद जावेद कबीर गंभीर जखमी झाले. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना रात्री त्यांची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी विशेष नमाजसाठी हजारो भाविकांची उपस्थिती होती. त्यानंतर अवघ्या काही तासांनंतर ही घटना घडली.
शुक्रवारी नमाजनंतर मोठ्या संख्येने भाविक झाडाखाली थांबून मित्र, आप्तस्वकीयांच्या भेटीगाठी घेतात. शुक्रवारीही दुपारी विशेष नमाज झाली. सायंकाळी ५.३० वाजता काही लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही प्रमाणात नागरिकांनी लग्न लावण्यासाठी गर्दी केली होती. अचानक मशीद परिसरातील एक गुलमोहराचे झाड उन्मळून पडले. यात मौलाना आझाद महाविद्यालयातील प्रा. सय्यद जावेद कबीर गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. ही घटना शहरात वाऱ्यासारखी पसरताच मौलाना आझाद महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांनी घाटीत धाव घेतली. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे प्राध्यापक म्हणून कबीर यांची महाविद्यालयात ख्याती होती. ते रोजेबाग परिसरातच राहत होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि चार मुले आहेत. पत्नी आणि मुले मुंबईला एका लग्न समारंभासाठी गेले आहेत. घरात फक्त त्यांच्या आई होत्या. शनिवारी सकाळी ११ वाजता रोजेबाग येथील औलिया मशीद येथे नमाज- ए- जनाजा पढण्यात येणार आहे.