अंबडमध्ये तूर विक्रीसाठी ट्रॅक्टर, बैलगाडींच्या रांगा
By Admin | Updated: February 28, 2017 00:56 IST2017-02-28T00:55:06+5:302017-02-28T00:56:29+5:30
अंबड : तुरीची आवक अचानक प्रचंड प्रमाणात वाढल्याने अंबड बाजार समितीस ६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे

अंबडमध्ये तूर विक्रीसाठी ट्रॅक्टर, बैलगाडींच्या रांगा
अंबड : तुरीची आवक अचानक प्रचंड प्रमाणात वाढल्याने अंबड बाजार समितीस ६ मार्चपर्यंत तूर खरेदी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. बाजार समिती आवारात तूर विक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांची जवळपास अडीचशे ट्रॅक्टर आदी वाहनांची गर्दी झाल्याने व केवळ एकच तूर खरेदी केंद्र सुरु असल्याने शेतकऱ्यांना कित्येक दिवसांचा मुक्काम करावा लागणार असल्याने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे बाजार समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे. नाफेडच्या वतीने राज्यात विविध ठिकाणी तुर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
नाफेडच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या तुर खरेदी केंद्रामध्ये प्रति क्विंटल ५ हजार ५० रुपयांचा भाव मिळत असल्याने नाफेडच्या या विविध खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मागील आठवडयात विविध कारणांनी जालना, गेवराई, पैठण, तीर्थपुरी आदी ठिकाणचे तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी अंबड कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात सुरु असलेल्या तूर खरेदी केंद्रावर तोबा गर्दी केली.
दोन दिवसांत बाजार समिती आवारात तूर आणलेल्या जवळपास अडीचशे ट्रॅक्टर आदी वाहनांनी गर्दी केल्याने बाजार समिती परिसरातील वाहतूक ठप्प झाली आहे. तूर नोंदणी व मोजणी करण्यासाठी एकच केंद्र असल्याने शेतकऱ्यांना जवळपास आठ दिवसांचा अवधी लागणार आहे. या सर्व बाबींचा विचार करुन अंबड बाजार समितीने ६ मार्चपर्यंत तूर खरेदी केंद्र बंद करण्याचा निर्णय सोमवारी जाहीर केला. आतापर्यंत या केंद्रावर २ हजार २०० क्विंटल तूर खरेदी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. समिती आवारात गेवराई, पैठण, घनसावंगी, तिर्थपुरी, पाचोड, कुंभार पिंपळगाव आदी ठिकाणच्या मुक्कामी असलेल्या शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करत असल्याचे सचिव पी.एस.सोळुंके यांनी सांगितले.