पर्यटन वारी सदस्यांच्या अंगलट येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:09 IST2021-02-05T04:09:54+5:302021-02-05T04:09:54+5:30

औरंगाबाद : ग्रामपंचायतीच्या निवडणूक आखाड्यात सोमवारी (दि.८) सरपंच, उपसरपंचाची निवड होणार आहे. त्या अनुषंगाने आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू ...

Tourism Wari members will come to grips | पर्यटन वारी सदस्यांच्या अंगलट येणार

पर्यटन वारी सदस्यांच्या अंगलट येणार

औरंगाबाद : ग्रामपंचायतीच्या निवडणूक आखाड्यात सोमवारी (दि.८) सरपंच, उपसरपंचाची निवड होणार आहे. त्या अनुषंगाने आरक्षण सोडतीनंतर इच्छुकांकडून मोर्चेबांधणी सुरू असून बहुतांश नवनियुक्त सदस्यांना सहलीवर पाठविण्यात आले आहे. मात्र सदस्यांना या निवड प्रक्रियेत सहभागी होण्याअगोदर प्रशासनाने कोरोना चाचणीची अट घातल्यामुळे ते बुचकळ्यात पडले आहे. एका अर्थाने गावात प्रवेश करण्याअगोदर संबंधित सर्व सदस्यांना कोरोना चाचणीचा अहवाल अध्यासी अधिकाऱ्यांना द्यावा लागणार आहे.

जिल्ह्यात १५ जानेवारीला मुदत संपणाऱ्या ६१७ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. या प्रक्रियेतून १८ जानेवारीला सदस्यांची निवड करण्यात आली असून त्यानंतर सरपंच पदाचा आरक्षण तालुकानिहाय घोषित झाले. यानंतर सरपंच पदाच्या अपेक्षेसाठी अनेक इच्छुकांनी संबंधित सदस्यांना सहलीवर पाठवले असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. त्यातच प्रशासनाने सोमवारी (दि.८) सरपंच आणि उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया निश्चित केली असून सर्व सदस्यांना निवड प्रक्रियेपूर्वी कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे सहलीवर गेलेल्या सदस्यांसह सर्वांनाच कोरोना चाचणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे सदस्यांना थेट निवड प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. तत्पूर्वी, त्यांना कोरोना चाचणी करून घेत त्यासंबंधीचा अहवाल अध्यासी अधिकाऱ्यांकडे जमा करावा लागणार असून यानंतर ते त्यांना निवड प्रक्रियेत सहभागी करून घेतील. यादरम्यान कुठल्याही सदस्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यास सर्वात शेवटी मतदान करण्याचा अधिकार देण्यात येईल. परंतु, त्याने या प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी स्वखर्चाने पीपीई किट घालून ग्रामपंचायत कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहे. या निर्णयामुळे अनेकांचे धाबे दणाणले असून विशेष म्हणजे सहलीवर गेलेल्या सदस्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

------- वैजापूर, पैठणची प्रक्रिया न्यायप्रविष्ट ------

सोमवारी होणारी सरपंच, उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया वैजापूर आणि पैठण तालुक्यात होणार नाही. कारण या दोन्ही तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असल्याने न्यायालयाच्या आदेशानंतर पुढील प्रक्रिया होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे सोमवारी वैजापूर व पैठण तालुका वगळून इतर सर्व तालुक्यातील सरपंच, उपसरपंच निश्चित करण्यासाठी कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

Web Title: Tourism Wari members will come to grips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.