आयएसओ ग्रामपंचायतींना पर्यटनाची जोड
By Admin | Updated: October 28, 2014 01:02 IST2014-10-28T00:51:06+5:302014-10-28T01:02:44+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. नियोजित आयएसओ ग्रामपंचायतींचा विकास पर्यटनाच्या

आयएसओ ग्रामपंचायतींना पर्यटनाची जोड
औरंगाबाद : जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळवून देण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेने सुरू केला आहे. नियोजित आयएसओ ग्रामपंचायतींचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने करण्यात येणार असून दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावात बोटिंग व रोप वे सुरू करण्यासह इतर सुविधा पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी दीपक चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींना उत्कृष्ट व दर्जेदार सेवेसाठी दिला जाणारा आयएसओ दर्जा मिळवून देण्याचा उपक्रम जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. आयएसओसाठीचे ग्रामपंचायतीचे प्रस्ताव दाखल झाले असून संबंधित संस्थेकडून त्यादृष्टीने मार्गदर्शनही करण्यात येत आहे. आयएसओची प्रक्रिया राबविताना यासोबतच काही ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नैसर्गिक पर्यटनस्थळांचा विकास करण्याची कल्पना पुढे आली व त्यावर आम्ही त्वरित कामही करीत आहोत.
पहिल्या टप्प्यात दौलताबाद घाटातील मोमबत्ता तलावाचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या रस्त्यावर पर्यटक मोठ्या प्रमाणावर येत- जात असतात. त्याशिवाय येथे पर्यटक काही वेळासाठी थांबतातही. त्यामुळे येथे एक पीकनिक स्पॉट सहज विकसित होऊ शकतो. त्यासाठी मोमबत्ता तलावात उतरण्यासाठी सुरक्षित रस्ता तयार करण्यासह तेथे बोटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा पहिला निर्णय घेण्यात आला. या स्थळाची पाहणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी केली. त्यानंतर दौलताबाद, कागजीपुरा व मावसाळा येथील सरपंच व उपसरपंच, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांची बैठक बोलावण्यात आली.
सदर जागेची कागदपत्रे तपासण्यात आली. ही जागा जिल्हा परिषदेच्या मालकीची असल्याने स्थळाचा विकास करणे अधिक सोपे झाल्याचे चौधरी यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेने ही पर्यटन स्थळे विकासाची मांडलेली कल्पना जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनाही आवडली. त्यांनी त्यासाठी निधी देण्यास मान्यता दिली आहे. रत्नागिरीहून बोटीसंदर्भात माहितीही घेण्यात आली. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न होईल व पर्यटकांचीही मोठी सोय होईल. पहिल्या टप्प्यात दौलताबाद, मावसाळा व कागजीपुरा या तीन ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यटन स्थळांचा विकास पायलट प्रोजेक्ट म्हणून करण्यात येणार आहे.
-उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, पंचायत विभाग
पहिली बैठक यशस्वी
४ग्रामपंचायतींना प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
४कागजीपुऱ्यातही सुंदर तलाव, ऐतिहासिक कागद कारखाना.
४मावसाळ्यात हिलस्टेशन, जि.प.चे विश्रामगृह करण्याचा संकल्प.
४म्हैसमाळला पर्यटकांसाठी कोणत्या सुविधा द्यावात, विचारमंथन सुरू.