चिंब पावसात पर्यटनाची धूम; स्वातंत्र्य दिनी पर्यटन राजधानी झाली 'हाऊस फुल'
By संतोष हिरेमठ | Updated: August 15, 2022 19:00 IST2022-08-15T18:57:41+5:302022-08-15T19:00:25+5:30
शहरवासीयांनी 'आझादी का अमृत महोत्सव'ची संधी साधत घराबाहेर पडत असून शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळी धाव घेतली.

चिंब पावसात पर्यटनाची धूम; स्वातंत्र्य दिनी पर्यटन राजधानी झाली 'हाऊस फुल'
औरंगाबाद : स्वातंत्र्य दिनानाचे औचित्य साधून जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर सोमवारी पर्यटकांनी एकच गर्दी केली. पर्यटनाचा आंनद घेताना 'भारत माता की जय' अशा गगनभेदी घोषणा पर्यटक देत होते.
शहरवासीयांनी 'आझादी का अमृत महोत्सव'ची संधी साधत घराबाहेर पडत असून शहर आणि जिल्ह्यातील पर्यटनस्थळी धाव घेतली. शहरातील बीबीका मकबरा, औरंगाबाद लेणी,दौलताबाद किल्ला येथे पर्यटकांची तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. दुपारनंतर पाऊस सुरू झाला. तरीही पर्यटकांची गर्दी सुरूच होती. औरंगाबाद लेणी, बीबीका मकबरा येथे पर्यटकांना वाहन उभे करण्यासाठीही जागा शोधावी लागत होती.
एरव्ही सुटीच्या दिवशी मकबऱ्याला पर्यटकांची चांगली गर्दी असते; परंतु सोमवारी इतर दिवसांपेक्षा अधिक गर्दी असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मोठ्या संख्येने पर्यटक मोटारीतून दाखल झाल्याने बीबीका मकबरा मार्गावर सोमवारी कोंडी झाली. वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले. कोरोनामुळे गेली दोन वर्षे पर्यटनाला कुठे जात आले नाही. मात्र आता सर्व खुले झाल्याने पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटनस्थळांकडे वळू लागली आहेत.