तूर वजनात ‘गोलमाल’!
By Admin | Updated: March 25, 2017 23:11 IST2017-03-25T23:06:11+5:302017-03-25T23:11:16+5:30
लातूर :एकीकडे नाफेडने शेतकऱ्यांची लूट केली तर दुसरीकडे गोदामातील तुरीचे वजन घटल्याने सरकारची फसवणूक होत आहे़

तूर वजनात ‘गोलमाल’!
लातूर : शेतकऱ्यांची लूट होऊ नये म्हणून शासनाने तुरीला ५ हजार ५० रूपये हमीभाव जाहीर करून हमीभाव खरेदी केंद्रावरच विक्री करण्याचे आवाहन केले़ मात्र हमीभाव खरेदी केंद्रावर एका कट्ट्याच्या पाठीमागे जवळपास १ किलो २०० ग्रॅम ज्यादा तूर घेऊन शेतकऱ्यांना लुटले़ तर विदर्भ को-आॅप़ मार्केटिंग फेडरेशनने वखार महामंडळाच्या गोदामात ठेवलेल्या तुरीच्या एका कट्ट्यात एक किलोची तूट झाल्याचे निदर्शनास आले आहे़ त्यामुळे एकीकडे नाफेडने शेतकऱ्यांची लूट केली तर दुसरीकडे गोदामातील तुरीचे वजन घटल्याने सरकारची फसवणूक होत आहे़
जिल्ह्यात नाफेड अंतर्गत आठ हमीभाव खरेदी केंद्र आहेत़ या केंद्रावर आजपर्यंत ११ हजार ८०० शेतकऱ्यांची १ लाख ८० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असून, १ हजार शेतकऱ्यांना ७४ कोटी रूपये देण्यात आले आहेत़ १५ कोटी रूपये थकीत आहेत़ तसेच लातुरात विदर्भ को-आॅप़ मार्केटिंग फेडरेशन मार्फत पाच हजार शेतकऱ्यांची ९६ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे़ खरेदी केलेली तूर महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आली़ नाफेड अंतर्गतच्या केंद्रांनी बारदाण्यासह ५० किलो ६०० ग्रॅम तूर खरेदी करणे अपेक्षित असताना या केंद्रावर ५१ किलो २०० ग्रॅमपर्यंत तूर घेऊन शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची तक्रार शेतकरी संघटनेचे राज्य समन्वयक लक्ष्मण वंगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती़ (अधिक वृत्त हॅलो/२वर)