नाणेटंचाईने ग्राहक, व्यापारी मेटाकूटीस
By Admin | Updated: August 3, 2014 01:16 IST2014-08-03T00:31:02+5:302014-08-03T01:16:20+5:30
गेवराई : येथील व्यापारपेठेत एक, दोन व पाच रुपयांच्या सुट्या नाण्यांची प्रचंड टंचाई सध्या जाणवत आहे. त्यामुळे कधी-कधी ग्राहक व व्यापारी यांच्यात वादही उद्भवू लागले आहेत.

नाणेटंचाईने ग्राहक, व्यापारी मेटाकूटीस
गेवराई : येथील व्यापारपेठेत एक, दोन व पाच रुपयांच्या सुट्या नाण्यांची प्रचंड टंचाई सध्या जाणवत आहे. त्यामुळे कधी-कधी ग्राहक व व्यापारी यांच्यात वादही उद्भवू लागले आहेत.
गेवराई शहरात मोठी बाजारपेठ आहे. कापड, भाजीपाला, किराणा, भुसार, गॅरेजलाईन येथे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. यासह पंचायत समिती, तहसील, रूग्णालये, रजिस्ट्री कार्यालय आदी ठिकाणीही मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची ये- जा असते. एकंदर या सर्वांमुळे येथील व्यापारपेठेतही मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते, असे असले तरी सध्या सुट्या नाण्यांचे मात्र येथे वाणवा असल्याचे दिसून येत आहे. चहाचे हॉटेल, पानटपरी, वडापाव सेंटर, किराणा दुकान अशा विविध ठिकाणी एक, दोन व पाच रुपयांच्या सुट्या नाण्यांसाठी ग्राहक व व्यापाऱ्यात तू- तू, मै- मै होताना दिसून येत आहे. अनेकदा काही व्यापारी कागदाच्या तुकड्यावर एक- दोन रुपयांचे आकडे लिहून आपले खाजगी चलनही व्यवहारात आणत असल्याची गंभीर बाब दिसून येत आहे. तर वेळ प्रसंगी व्यापाऱ्यांना सुटे नाणे पाच ते सात रुपये शेकड्याने विकत घेण्याची वेळही येत आहे. तर काही व्यापारी सुटे पैसे देण्याऐवजी चक्क चॉकलेट देऊन ग्राहकांची बोळवण करीत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे येथील बँकांनी सुटे नाणे उपलब्ध करून देण्याची मागणी राजू शिंदे, मनोज जैस्वाल, रामेश्वर पाटेकर, उमेश मानधने आदींनी केली.(वार्ताहर)