‘त्या’ चार जागांची उद्या मतमोजणी
By Admin | Updated: October 27, 2015 00:22 IST2015-10-27T00:16:43+5:302015-10-27T00:22:49+5:30
कळंब : ग्रामपंचायतीच्या काही नवनिर्वाचित सदस्यांनी बाजार समिती निवडणुकीत आपल्याला मताधिकार मिळावा यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका

‘त्या’ चार जागांची उद्या मतमोजणी
कळंब : ग्रामपंचायतीच्या काही नवनिर्वाचित सदस्यांनी बाजार समिती निवडणुकीत आपल्याला मताधिकार मिळावा यासाठी उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका काढून घेतल्यामुळे न्यायालयाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मतमोजणीची पुढील प्रक्रिया करण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार ग्रामपंचायत मतदार संघातील चार जागांची मतमोजणी बुधवारी होणार आहे. कळंब बाजार समितीच्या अठरा जागांसाठी ११ आॅक्टोबर रोजी मतदान झाले होते. यापैकी ग्रामपंचायत मतदारसंघासाठी ७६७ ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क होता. तत्कालीन निवडणूक कार्यक्रम कालावधीतच तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या. यामध्ये अनेक ग्रामपंचायतीत बदल होवून नवीन सदस्यांची निवड झाली. यातील काही नूतन सदस्यांनी आपल्याला बाजार समिती निवडणुकीत ग्रा.पं. मताधिकार मिळावा यासाठी ४ स्वतंत्र याचिका उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केल्या होत्या. त्यामुळे १३ आॅक्टोबर रोजी केवळ सेवा संस्था, व्यापारी आणि हमाल मापाडी मतदारसंघातील जागांची मतमोजणी प्रक्रिया करून १४ जागांचे निकाल जाहीर करण्यात आले. तर ग्रामपंचायत मतदारसंघाची मतमोजणी स्थगित करून मतपेट्या तसेच सीलबँड ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, याचिकाकर्त्यांनी आपली याचिका मागे घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुढील प्रक्रिया पूर्ण करावी, असे निर्देश न्यायालयाने २१ आॅक्टोबर रोजी दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत मतदारसंघातील ४ जागांसाठीची मतमोजणी बुधवारी सकाळी ८ वाजता प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात होणार असल्याची माहिती सहाय्यक निबंधक सी. पी. बनसोडे यांनी दिली. (वार्ताहर)