१३ पैकी एकाही गावामध्ये भेटले नाहीत तलाठी
By Admin | Updated: June 26, 2014 00:41 IST2014-06-26T00:32:30+5:302014-06-26T00:41:12+5:30
हिंगोली : तालुक्यातील सात तलाठी सज्जातील ९ गावांना कामाच्यावेळी भेटी दिल्यानंतर एकाही गावात तलाठी आढळला नाही.

१३ पैकी एकाही गावामध्ये भेटले नाहीत तलाठी
हिंगोली : तालुक्यातील सात तलाठी सज्जातील ९ गावांना कामाच्यावेळी भेटी दिल्यानंतर एकाही गावात तलाठी आढळला नाही. जवळपास प्रत्येक गावातील ग्रामस्थांना कमी-अधिक कामासाठी हिंगोली शहर गाठावे लागते. मागील अनेक वर्षांपासून ही स्थिती कायम आहे. दरम्यान तलाठी बदलले तरी हिंगोलीला जाण्याचे थांबलेले नाही. परिणामी तलाठ्याचे कार्यस्थळ गाव जरी असले तरी प्रत्येकजण हिंगोलीवरून कारभार पाहत असल्याचे निदर्शणास आले.
शेतकऱ्यांचे सातबाराशी जिवाळ्याचे आणि अत्यंत नाजूक संबंध आहेत. शेतकरी आणि सातबारामधील दुवा म्हणून महसूल विभागातील तलाठ्याकडे पाहिले जाते. म्हणून तलाठ्याचे महत्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने सर्वाधिक आहे; परंतु आजघडीला तलाठी बागूलबुवा बनत चाललेला आहे. ‘लोकमत’च्या प्रतिनिधीनी प्रत्येक गावात जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता एकही तलाठी कार्यस्थळी दिसून आला नाही. हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे सकाळी सव्वा दहा वाजता भेट दिली असता तलाठी कार्यस्थळी हजर नव्हते. त्यानंतर सवड या गावास भेट दिली असता, वरिष्ठ कार्यालयाचे काम निघाले तरच येथील तलाठी सोनाली आरगडे या गावात पाय ठेवतात. शैक्षणिक वर्षाची सुरूवात असो वा लग्नसराईचे दिवस असोत तलाठी आठवडा किवा पंधरवाड्यातून एखादवेळी गावात दर्शन देतात. प्रत्येक कामासाठी ग्रामस्थांना हिंगोली गाठावी लागते, असे मुन्ना थोरात यांनी सांगितले. सव्वाबारा वाजता घोटा देवीच्या ओट्यावर बसलेल्या ग्रामस्थांसोबत प्रतिनिधीने चर्चा केली. येथील ग्रामस्थांना कामासाठी हिंगोली शहरात जावे लागते. आठवडा किवा पंंधरवाड्यातून एकदा तलाठी रुपाली नरवाडे या गावात येतात. मागील तीन वर्षांपासून ही परिस्थती आजतागायत कायम आहे; मात्र मागील तलाठ्याप्रमाणे कामासाठी द्याव्या लागणाऱ्या रक्कमेपासून सुटका झाल्याचे माजी सरपंच सुधाकर शेळके, तुळशीराम शेळके यांनी सांगितले.
राहोली बु. येथे तलाठी आणि मंडळ अधिकारी सारखेच असल्याचे गावातील एका ग्रहस्थाने सांगितले. आठवड्यातून एखाद्या दिवशी तलाठी कु. एम. एस. खंदारे गावात येतात. विशेषत: वरिष्ठांच्या कामासाठी तलाठी ज्याप्रमाणे तातडीने गाव गाठतात त्याप्रमाणे ग्रामस्थांच्या कामासाठी तलाठी धावून येत नाहीत. योगायोगाने बुधवारी गावात न्यायाधीशांच्या उपस्थित कार्यक्रम असल्यामुळे आजच तलाठ्याचे दर्शन झाल्याचे एका ग्रामस्थाने सांगितले. येथील तलाठ्याबाबत ग्रमस्यांनी नाराजी व्यक्त केली.
पहिल्यांदा आमच्या गावाला बऱ्यापैैकी तलाठी मिळाल्याचे कोथळज येथील सरपंच अनिल घुगे यांनी सांगितले. आठवड्यातून एकदा तलाठी शेख गावात हजेरी लावतात; आचनक आलेल्या कामासाठी ग्रामस्थांना हिंगोली शहरात जावे लागते; परंतु कोणत्याही बाबतीत अडवणूक झालेली नाही.
कळमकोंडा आणि टाकळी तर्फे नांदापुरसाठी तलाठी म्हणून सुजाता गायकवाड कार्यरत आहेत. बुधवारी दुपारी अडीच वाजता कळमकोंडा येथील ग्रामस्थाशी चर्चा केली असता गावात नियमित तलाठी येत नाहीत. आठवड्यातून एखादी भेट तलाठ्याची राहते. परिणामी कामासाठी हिंगोली शहर गाठावे लागते, असे ग्रामस्थांनी सांगितले. टाकळी तर्फे नांदापूर येथे दुपारी ३ वाजता भेट दिल्यानंतर येथे देखील सुजाता गायकवाड तलाठी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. कळमकोंडा येथील ग्रामस्थांसारखीच प्रतिक्रिया टाकळी येथील ग्रामस्थांनी दिली. तलाठी गावात नियमित येत नाहीत. हिंगोली शहरातील कार्यालयात जावून कामे करावी, लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
दुपारी पाऊणे तीन वाजता हिंगणी गावास भेट दिली असता येथील सज्जाचे तलाठी व्ही. आर. देवधरे यांना बहुतांश ग्रामस्थांनी एकदाही तलाठी पाहिला नसल्याचे सांगितले. मागील वर्षभरापासून तलाठी देवधरे काम पाहत असताना बोटावर मोजात येतील एवढे दिवस ते गावात आले असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले. दुपारी चार वाजता खेड येथील ग्रामस्थांनी हिची व्यथा मांडली.
ग्रामस्थांची हिंगोली वारी ठरलेली
हिंगोली तालुक्यातील कनेरगावनाका येथील कार्यालयास ‘लोकमत’ प्रतिनिधीनी सकाळी ११ वाजता भेट दिली असता येथील तलाठी पी. एस. जारे हे आठवड्यातून एक दिवस गावात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तो कोणता दिवस असेल, हे मात्र निश्चित नसल्याचे ग्रामस्थ म्हणाले. त्यानंतर फाळेगाव येथील तलाठी सज्जास भेट दिली असता येथील तलाठी मोनाली गोटे या गेल्या आठ दिवसांपासून गावात आल्या नसल्याचे येथील ग्रामपंचायतीचे सेवक बळीराम खोरणे यांनी सांगितले. गोटे या ग्रामपंचायत कार्यालयातच येऊन बसतात. त्या मुळच्या वाशिम जिल्ह्यातील असल्याचे खोरणे म्हणाले. त्यानंतर आटगाव मुटकुळे या गावास १२ च्या सुुमारास भेट दिली असता येथील तलाठी श्रीमती एम. एच. तोडकर या गेल्या दोन महिन्यांपासून गावात आल्या नसल्याचे गोपाल मुटकुळे, संजय पाटील, गजानन मुटकुळे, शोभाताई अग्रवाल, नवनाथ मुधोळकर, संतोष अग्रवाल, कैलास अग्रवाल यांनी सांगितले. तोडकर या हिंगोलीत राहतात व येथूनच त्यांचा कारभार चालतो. काही कागदपत्रे हवी असल्यास हिंगोली गाठावी लागते व त्यांच्या घरी चकरा माराव्या लागतात, असेही ग्रामस्थ म्हणाले. त्यानंतर खंडाळा या गावास भेट दिली असता येथील तलाठी कीर्ती मसारे या हिंगोली येथे राहतात व पंधरा दिवसांतून एक वेळा गावात येतात. त्या ग्रामपंचायत कार्यालयात काळी वेळ बसतात व निघून जातात. कागदपत्रे हवी असल्यास हिंगोलीलाच ग्रामस्थांना जावे लागते, असे येथील ग्रामस्थ मोतीराम गायकवाड, शालीग्राम वानखेडे, लक्ष्मण गायकवाड, रामजी गायकवाड, सुनील गायकवाड यांनी सांगितले. त्यानंतर माळसेलू येथील तलाठी सज्जास सव्वा १ वाजता भेट दिली असता येथील तलाठी एस.बी. देशमुख हे पंधरा दिवसातून एक वेळा गावात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर तलाठ्याला भेटण्याचा दिवस सोमवार व शुक्रवार लिहण्यात आला आहे; या दोन्ही दिवशी ते गावात येत नसल्याचे कैलास देशमुख, विठ्ठल वामन, यादवराव वामन या ग्रामस्थांनी सांगितले. भिंगी येथे चौकशी केली असता तलाठी दिलीप घ्यार हे आठ दिवसांतून एक दिवस गावात येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. ते हिंगोली येथूनच कारभार पाहत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.