मनपासाठी आज मतदान
By Admin | Updated: April 18, 2017 23:46 IST2017-04-18T23:44:31+5:302017-04-18T23:46:23+5:30
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या एकूण १८ प्रभागांतील ७० जागांसाठी बुधवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून, प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.

मनपासाठी आज मतदान
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेच्या एकूण १८ प्रभागांतील ७० जागांसाठी बुधवारी सकाळी ७.३० वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून, प्रशासनाने मतदानाची जय्यत तयारी केली आहे. मतदान यंत्रांसह सर्व साहित्य मतदान केंद्रांवर पोहोचले असून, शहरातील ३७१ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यासाठी २ लाख ७७ हजार ७७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यात १ लाख ४६ हजार २४४ पुरुष मतदार असून, १ लाख ३१ हजार ५३० महिला मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय व बूथनिहाय मतदारांची यादी यापूर्वीच प्रसिद्ध केली असून, आता मतदानाची वेळ आली आहे. त्यासाठी प्रशासनाने २ हजार २८३ कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्त केले आहेत. एकूण ३७१ केंद्रांवर मतदान होणार आहे. त्यातील ८९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. प्रत्येक केंद्रांवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक आणि अन्य चार कर्मचारी निवडणूक आयोगाने नियुक्त केले आहेत. या कर्मचाऱ्यांना तीनवेळा मतदान प्रक्रियेविषयी प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यांची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी दर्जाचे एकूण सहा निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. या अधिकाऱ्यांमार्फत निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येत आहे. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना प्रत्येकी तीन प्रभाग देण्यात आले आहेत. या प्रभागांतील सर्व मतदान प्रक्रिया संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आहे. त्यानुसार ३७१ मतदान यंत्र, कंट्रोल युनिट, बॅलेट युनिट मतदान केंद्रांवर पोहोचती करण्यात आले असून, मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्यास मास्टर ट्रेनर व ट्रेनरच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात मास्टर ट्रेनर व ट्रेनर असतील. तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास मास्टर ट्रेनर मतदान केंद्रांवर तात्काळ पोहोचणार आहेत.
लातूर मनपासाठी २ लाख ७७ हजार ७७४ मतदारांची संख्या असून, यात १ लाख ३६ हजार २४४ पुरुष मतदार असून, १ लाख ३१ हजार ५३० महिला मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्र. ९ मध्ये सर्वाधिक २० हजार ४४८ मतदार आहेत. तर सर्वात कमी मतदारसंख्या असलेला प्रभाग १८ असून, या प्रभागात केवळ ९ हजार ४५५ मतदार आहेत. उर्वरित सर्वच प्रभागांत दहा ते अठरा हजारांपर्यंत मतदारांची संख्या आहे. (प्रतिनिधी)