अंबाजोगाई कारखान्यासाठी आज मतदान
By Admin | Updated: January 15, 2017 01:03 IST2017-01-15T01:02:06+5:302017-01-15T01:03:49+5:30
अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे

अंबाजोगाई कारखान्यासाठी आज मतदान
अंबाजोगाई : अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी मतदान होत आहे. या निवडणुकीत भाजपचे रमेश आडसकर व दत्तात्रय पाटील आमने-सामने आहेत. काँग्रेस आडसकरांच्या तर राष्ट्रवादी दत्ता पाटलांच्या पाठीशी उभी राहिल्याने निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे.
४५ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र अंबाजोगाई, परळी, केज, धारूर, रेणापूर या पाच तालुक्यातील असून ३४४ गावांचा कार्यक्षेत्रात समावेश आहे. तर १८५०० मतदार आहेत. रविवारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अंबासाखरच्या निवडणुकीसाठी प्रारंभीपासूनच आडसकर विरुद्ध पाटील ही दोन्ही पॅनलची लढत पारंपारिकपणे चालत आलेली आहे. कै. डी. एन. पाटील हे साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष होते तर पुढे माजी आ. स्व. बाबुराव आडसकर यांनी हा साखर कारखाना आपल्या ताब्यात घेतला. आजही या साखर कारखान्यांवर आडसकरांचेच वर्चस्व आहे.
जुने सहकारी व नवीन कार्यकर्त्यांची मोठी फौज घेऊन रमेश आडसकर मैदानात उतरले आहेत. त्यांच्यासोबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, राजेसाहेब देशमुख, हनुमंत मोरे, राष्ट्रवादीचे विलास सोनवणे यांचे पाठबळ असून, पालकमंत्री पंकजा मुंडे याही त्यांच्या मागे उभ्या आहेत.
दत्तात्रय पाटील यांनीही परळी येथील काँग्रेसचे राजेश देशमुख, नंदकिशोर मुंदडा, जि. प. सभापती बजरंग सोनवणे, भाजपाचे राजेश कराड, शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट या सर्वांना सोबत घेऊन मोट बांधली आहे. (वार्ताहर)