गावकारभाऱ्यांचा आज फैसला !

By Admin | Updated: August 6, 2015 00:05 IST2015-08-05T23:59:32+5:302015-08-06T00:05:21+5:30

उस्मानाबाद : जिल्हाभरातील सुमारे ३७९ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले होते. ग्रामीण भागातील मतदारांमध्ये असलेल्या उत्साहामुळे मतदानाचा टक्काही वाढला.

Today's decision of the villagers! | गावकारभाऱ्यांचा आज फैसला !

गावकारभाऱ्यांचा आज फैसला !



उस्मानाबाद : जिल्हाभरातील सुमारे ३७९ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान झाले होते. ग्रामीण भागातील मतदारांमध्ये असलेल्या उत्साहामुळे मतदानाचा टक्काही वाढला. जिल्ह्यात तब्बल ८०.५४ टक्के एवढे मतदान झाले होते. दरम्यान, गुरूवारी सकाळी काही ठिकाणी आठ तर काही ठिकाणी नऊ वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात होईल.
उस्मानाबाद जिल्ह्यातील ४२२ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासूनच गल्लीपासून जिल्ह्यापर्यंतच्या पदाधिकारी, नेतेमंडळींनी ग्रामपंचायती आपल्याच पक्षाच्या ताब्यात ठेवण्यासाठी धावपळ सुरू केली होती़ उमेदवारी अर्ज भरेपर्यंत आणि मागे घेण्याच्या क्षणापर्यंत अनेक गावातील पक्षांतर्गत कलह, गट-तट व बंडखोरी प्रकर्षाने समोर आले़ ३७९ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या नवडणुकीमध्ये ८०़५४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ यात जिल्ह्यातील ५ लाख ५६ हजार ८१८ मतदारांपैकी ४ लाख ४८ हजार ४९५ मतदारांनी हक्क बजावला. सर्वाधिक ८६़१७ टक्के मतदान परंडा तालुक्यात झाले़ तर सर्वात कमी मतदान उमरगा तालुक्यात ७४़३० टक्के झाले़ उस्मानाबाद तालुक्यात ८०़६० टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला़ सर्वांच्या नजरा लागलेली मतमोजणी गुरूवारी होत आहे. सकाळी आठ प्रारंभ होईल. त्यानुषंगाने निवडणूक विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. मतमोजणी सुरळीत पार पडावी, यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. लोहारा येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. यासाठी ३० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दहा टेबलवर एकाच वेळी सात फेऱ्यांमध्ये मतमोजणी होईल, असे नायब तहसीलदार मुस्तफा खोंदे यांनी दिली. यावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोनि संतोष गायकवाड यांनी सांगितले आहे.
येथे होणार मतमोजणी
उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामपंचायतींची मतमोजणी तहसील कार्यालयातील महसूल भवन येथे होईल. तसेच तुळजापूर येथील मतमोजणी श्री तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्पोर्टस हॉल, लोहारा : तहसील कार्यालय, कळंब : तांदुळवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परंडा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह आणि वाशी येथील मतमोजणी तहसील कार्यालय येथे होणार असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
भूम तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी येथील शासकीय गोडाऊनमध्ये गुरुवारी सकाळी ९ वाजता सुरुहोईल. यासाठी १४ टेबलांचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीसाठी २८ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. फेरीनिहाय निकाल ध्वनीक्षेपकावरून जाहीर करण्यात येणार आहे. निकालावेळी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी सांगितले.
परंडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेकर वसतिगृहात गुरुवारी मतमोजणी होणार असून, या ठिकाणी शंभर पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्राच्या अंतर्गत भागात १ पोलिस अधिकारी व दहा पोलिस कर्मचारीही तैनात राहणार असल्याचे पोनि डंबाळे यांनी सांगितले.
उमरगा येथे मतमोजणीसाठी १४ टेबलचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीच्या ठिकाणी केवळ पासधरकांनाच प्रवेश देण्यात येणाार आहे. वाशी येथेही १२ टेबलांचे नियोजन करण्यात आले आहे. मतमोजणीच्या अनुषंगाने ५ आॅगस्ट रोजी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. उस्मानाबाद, परंडा, तुळजापूर, कळंब याही ठिकाणी सकाळीच मतमोजणीला सुरूवात होईल.

Web Title: Today's decision of the villagers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.