११ वी प्रवेशासाठी अॉनलाईन नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 11:40 IST2018-06-25T11:39:58+5:302018-06-25T11:40:50+5:30
दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीतील प्रवेशासाठी अॉनलाईन नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे.

११ वी प्रवेशासाठी अॉनलाईन नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस
औरंगाबाद : दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावीतील प्रवेशासाठी अॉनलाईन नोंदणी करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. बायफोकल विषयाच्या दुसऱ्या फेरीचा पसंतीक्रम भरण्याचाही सोमवार शेवटचा दिवस आहे. ही नोंदणी सायंकाळी पाच वाजेपर्यंत करावी लागणार आहे.
राज्यातील प्रमख महानगरांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी अॉनलाईन प्रक्रिया राबविण्यात येते. यात औरंगाबाद शहरात मागील वर्षीपासून अॉनलाईन नोंदणीनंतर गुणवत्ता यादीद्वारे प्रवेश देण्यात येत आहेत. अकरावी प्रवेशासाठी भाग-१ व २ प्रकारात अॉनलाईन नोंदणी करावी लागते. यात पहिला भाग भरण्याची प्रक्रिया जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाली होती, तर भाग-२ भरण्यास दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १३ जूनपासून सुरूवात झाली. शहरातील उच्च माध्यमिकच्या ११२ महाविद्यालयांतील प्रवेशासाठी शनिवारपर्यंत (दि.२३) २० हजार ७५७ विद्यार्थ्यांनी अॉनलाईन नोंदणी केली. यात रविवारी मोठी भर पडण्याची शक्यता शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याचवेळी बायफोकल विषयांच्या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या उर्वरित जागांसाठीची नोंदणी सुरू आहे. दुसऱ्या फेरीच्या पसंतीक्रमासाठी सोमवारी (दि.२३) सायंकाळी पाच वाजेपर्यंतच नोंदणी करावी लागणार आहे. याची गुणवत्ता यादी २८ जून रोजी जाहीर होणार आहे.
२९ जूनला सर्वसाधारण गुणवत्ता यादी
अकरावीच्या प्रवेशाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी २९ जून रोजी नियोजित वेळापत्रकानुसार लागणार आहे. यानंतर ३० जून ते २ जुलैदरम्यान यावर हरकती घेता येतील. त्यानंतर ३ जुलै रोजी हरकतीचे निराकरण केले जाईल. पहिली नियमित गुणवत्ता यादी ५ जुलै रोजी जाहीर केली जाणार आहे.