जिल्ह्यात ३० ठिकाणी आज चक्काजाम
By Admin | Updated: January 31, 2017 00:11 IST2017-01-31T00:10:26+5:302017-01-31T00:11:42+5:30
लातूर :मराठा समाज क्रांती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यातील ३० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात ३० ठिकाणी आज चक्काजाम
लातूर : मराठा समाजास आरक्षण, महिलांना संरक्षण आणि शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासह अन्य मागण्यांसाठी मराठा समाज क्रांती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्ह्यातील ३० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी रात्री शहरातील यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्समधील मराठा क्रांती भवनात समाज बांधवांची बैठक झाली. मंगळवारी जिल्ह्यात ३० ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून, यात लातूर शहरातील बसस्थानक, गरुड चौक, ५ नंबर चौक, नवीन रेणापूर नाका, राजीव गांधी चौक या पाच ठिकाणी तर ग्रामीण भागातील चाकूर, औसा-तुळजापूर मोड, रेणापूर तालुक्यातील पिंपळगाव फाटा, लामजना पाटी, निलंग्यातील छत्रपती शिवाजी चौक, अहमदपुरातील छत्रपती शिवाजी चौक, लातूर तालुक्यातील तांदुळजा, कवठा पाटी, हाडगा मोड, हलगरा, औराद शहाजानी, उदगीर, देवणी मोड अशा जवळपास २५ ठिकाणी हे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर परळी-हैदराबाद व लातूर-मुंबई रेल्वेही रोखण्यात येणार आहे.
दरम्यान, या आंदोलनासाठी गेल्या आठवडाभरापासून तालुकास्तरावर बैठका घेऊन रुपरेषा सांगण्यात आली. या आंदोलनात समाज बांधवांसह महिला व कुटुंबीयांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, या आंदोलनाचा शेतकरी, दूध विक्रेत्यांना त्रास होऊ नये म्हणून त्यांनी गावातून बाहेर पडू नये, शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील इच्छुकांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज भरू नये, राजकीय पक्ष व संघटनांनी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये, रुग्णवाहिकेसाठी रस्ता खुला करून द्यावा, असे आवाहन मराठा समाज क्रांती समितीच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)