ऑक्सिजन न मिळाल्याने तितुरच्या वृद्धाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:04 IST2021-04-22T04:04:26+5:302021-04-22T04:04:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सोयगाव : ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने जरंडी, निंबायती कोविड केंद्रच ऑक्सिजनवर आली आहेत. एका कोरोनाबाधित वृद्धाला ...

ऑक्सिजन न मिळाल्याने तितुरच्या वृद्धाचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
सोयगाव : ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याने जरंडी, निंबायती कोविड केंद्रच ऑक्सिजनवर आली आहेत. एका कोरोनाबाधित वृद्धाला ऑक्सिजन न मिळाल्याने जीव गमवावा लागला आहे. ही दुर्देवी घटना तितुर गावात बुधवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. बापू दगडू आहिरे (६५) असे मृत्यू झालेल्या रुग्णाचे नाव आहे.
तितुर येथील एका रुग्णाला सात दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्याला जरंडी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याठिकाणी कोरोनावर मात करून तो रुग्ण घरी परतल्यानंतर त्याच्या वडिलांची अर्थात बापू दगडू आहिरे (६५) यांची तब्येत बिघडली. त्यांना बनोटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांची ॲंन्टिजेन चाचणी करण्यात आली. यात त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज होती. यावेळी तातडीने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यास सांगण्यात आले. परंतु, जरंडी कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये जाण्याचाही सल्ला देण्यात आला. परंतु, रुग्णाला उपचारासाठी पैसे आणायचे कोठून ही आर्थिक विवंचना सुरू होती. यात दुपारनंतर बापू आहिरे यांची ऑक्सिजन पातळी खालावल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. जरंडी किंवा निंबायती कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन सुविधा उपलब्ध असती, तर या वृद्ध रुग्णाचा जीव वाचवता आला असता. परंतु, आरोग्य यंत्रणा ही सुविधा देण्यात अपयशी ठरू लागल्याने रुग्णाला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाबाधित रुग्ण असल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासही गावातून कोणीही ग्रामस्थ धजावत नव्हते. अखेर पोलीसपाटील विष्णू पाटील, सरपंच रवींद्र सोनवणे, मृत वृद्धाचा मुलगा ज्ञानेश्वर आहिरे या तिघांनी अंत्यसंस्काराचा विधी पार पडला.
आरोग्य पथक तितुरमध्ये दाखल
दोन दिवसांपूर्वी पिता-पुत्राचा कोरोनाने मृत्यू झाला होता. तोच आज परत एका कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाचे पथक तितुर गावात दाखल झाले. जवळपास १२० ग्रामस्थांची ॲंन्टिजेन चाचणी करण्यात आली. त्यात सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. तितुर गावात आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला आहे तर सध्या चार बाधितांवर जरंडी केंद्रात उपचार सुरू आहेत.
तितुर येथील रुग्णाची बनोटी प्राथमिक आरोग्य केंद्रात ॲंंन्टिजेन चाचणी पाॅझिटिव्ह आली. त्यांची ऑक्सिजन पातळी धोक्याची होती. त्यामुळे तातडीने जरंडी कोविड केंद्रात दाखल केल्यानंतर त्यांना औरंगाबाद येथे हलविण्यात येणार होते. मात्र, रुग्ण जरंडी येथे पोहोचण्याच्या आधीच मयत झाला.
- डॉ. श्रीनिवास सोनवणे, तालुका आरोग्य अधिकारी, सोयगाव.
तालुक्यासाठी मंजूर झालेली ऑक्सिजन यंत्रणा रद्द झाली. त्यावर आता पुनर्विचार सुरू आहे. जिल्हा परिषद आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. विशेष बाब म्हणून पुन्हा प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे लवकरच ऑक्सिजन मिळेल, अशी अपेक्षा आहे.
- प्रवीण पांडे, तहसीलदार, सोयगाव.