दारू दुकानदारांकडून वेळेचे उल्लंघन
By Admin | Updated: August 7, 2015 01:14 IST2015-08-07T01:11:14+5:302015-08-07T01:14:45+5:30
लातूर : निर्धारित वेळेच्या अगोदरच दारूचे दुकान उघडून देशी दारू विक्री केल्या प्रकरणी सहा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि श

दारू दुकानदारांकडून वेळेचे उल्लंघन
लातूर : निर्धारित वेळेच्या अगोदरच दारूचे दुकान उघडून देशी दारू विक्री केल्या प्रकरणी सहा दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क आणि शहर पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई गुरुवारी केली. पथकाने प्रति दुकानाला ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
लातूर शहर पोलिस आणि राज्य उत्पादन शुल्कच्या बारा कर्मचारी असलेल्या पथकाने गुरुवारी सकाळी लातूर शहरातील एकूण ३९ देशी दारू दुकानांची तपासणी केली. या तपासणीत दयानंद गेट, बारा नंबर पाटी, पाच नंबर चौक, जुना रेणापूर नाका, नवा रेणापूर नाका, हरंगुळ (बु.) येथील सहा देशी दारू दुकाने निर्धारित वेळेअगोदरच सुरू होती. सकाळी ६ वाजेपासून या दुकानांतून देशी दारूरूची विक्री केल्याचे निदर्शनास आले. दुकान सुरू करण्याची निर्धारित वेळ सकाळी १० वाजेची आहे. परंतु, पहाटे ६ वाजेपासूनच ही सहा दुकाने सुरू होती. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आहे. शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक डोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी पोलिस ठाण्याचे रत्नाकर गायकवाड यांच्या पथकाने गुरुवारी दिवसभर ३९ दुकानांची तपासणी केली. दुकानांत असलेला स्टॉक, दुकानाची निर्धारित वेळ व त्यातील नोंदी तपासण्यात आल्या. या तपासणीत ६ दुकाने निर्धारित वेळेपेक्षा अगोदरच सुरू होती. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती शहर पोलिस उपाधीक्षक मंगेश चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)