लोह्यात वादळीवारे, पाऊस
By Admin | Updated: May 22, 2014 00:30 IST2014-05-22T00:21:11+5:302014-05-22T00:30:21+5:30
लोहा : गत दोन दिवसांपासून वातावरणात बदलाचे संकेत जाणवत होते़ मंगळवारी दिवसभर उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त होते़ उकाड्यामुळे तर जीव कासावीस होत होता़

लोह्यात वादळीवारे, पाऊस
लोहा : गत दोन दिवसांपासून वातावरणात बदलाचे संकेत जाणवत होते़ मंगळवारी दिवसभर उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त होते़ उकाड्यामुळे तर जीव कासावीस होत होता़ मात्र सायंकाळी अचानक ढगाळ वातावरण होवून सायंकाळी प्रचंड वादळी-वार्यासह पावसाने लोहा शहरासह परिसराला मोठा तडाखा दिला़ विद्युत पोल व झाडेू उन्मळून पडले़ तर विद्युत तारा तुटल्यामुळे २४ तासांपासून विद्युतपुरवठा खंडित झाला़ रात्री झालेल्या वादळी वार्यात जुन्या लोह्यातील ४५ वर्षीय इसमाच्या अंगावर झाड कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला़ मार्च महिन्यात अवेळी पाऊस व गारपीटीने हैदोस घालत शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक मातीमोल केले़ मंगळवारी लोह्याचा आठवडी बाजार असल्याने ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात लोह्यात आले़ मात्र सायंकाळी अचानक वादळी वार्यासह पावसाने हजेरी लावल्यामुळे व्यापार्यासह ग्राहकांची तारांबळ उडाली़ जवळपास अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लोहा बसस्थानकात बस उभ्या होत्या़ अनेकांच्या घरावरील कौलारू, पत्रे उडून गेली़ त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना पत्रे शोधण्यासाठी व्यत्यय निर्माण झाला़ घरावरील छतही गेले, त्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांनी रात्र उघड्यावर काढली़ जुना लोह्यातील भोईगल्ली परिसरातील भगवान भिवाजी परडे (वय ४५) हे कामानिमित्त बाहेर गेले़ त्या दरम्यान अचानक झालेल्या वादळी वार्यात त्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने त्यांच्या डोक्यास मार लागला़ त्यांना उपचारार्थ लोह्याच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता पहाटे त्यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी मयताचा मुलगा संभाजी परडे यांच्या माहितीवरून लोहा पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली़ मंगळवारी झालेल्या वादळी वार्याने कंधार-लोहा मुख्य लाईनवरील इन्स्थुलेटर ब्रेक झाल्याने तसेच विद्युतपोल व तारांचे नुकसान झाल्याने लोहा शहर व माळाकोळी भागात नुकसान झाल्याने शहरातील वीजपुरवठा २४ तासापासून बंद आहे़ परिणामी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली़ शेतातील भुईमुग काम सुरू असून भुईमुगास पावसाचा मोठा फटका बसला़ (वार्ताहर) वीज पडून शेतकर्याचा मृत्यू नवीन नांदेड: शेतीचे कामे संपल्यानंतर लिंबाच्या झाडाखाली झोपलेल्या एका ३२ वर्षीय तरूण शेतकर्याच्या अंगावर वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना २० मेच्या रात्री एक वाजण्याच्या सुमारास मार्र्कं ड शिवारात घडली आहे. शिवाजी हारजी बोकारे असे मयताचे नाव आहे. २० मे रोजी दिवसभर ‘मार्र्कं ड’ शिवारातील त्यांच्या शेतीतील मशागतीचे सर्व कामे केली. शेतातील मोगडा संपल्यानंतर ते लिंबाच्या झाडाखाली बाजेवर झोपले. मंगळवारी एक वाजण्याच्या सुमारास शिवाजी बोकारे हे झोपेमध्ये असतानाच त्यांच्या अंगावर वीज पडली, यामध्येच ते गंभीर जखमी होऊन जागीच मरण पावले. याप्रकरणी मुंजाजी हारजी बोकारे रा. मार्र्कं ड, यांनी दिलेल्या माहितीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवार दि. २१ मेच्या पहाटे आकस्मिक मुत्युची नोंद करण्यात आली.पो.हे.कॉ. प्रकाश कुंभारे व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर) शहर व परिसरात उखडून पडलेले विद्युत पोल व तुटलेल्या तारांचे दुरूस्ती काम वीज कर्मचारी व गुत्तेदारांकडून प्रगतीपथावर सुरू असून खंडित झालेला वीजपुरवठा काही तासात सुरळीत होईल - राम पराडकर (उपअभियंता, मराविम कं़ लोहा)