सत्संग कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ

By Admin | Updated: January 5, 2015 00:36 IST2015-01-05T00:33:31+5:302015-01-05T00:36:47+5:30

उस्मानाबाद : शहरातील श्री तुळजाभवानी दूध संघासमोरील लॉन्समध्ये आयोजित सत्संग सोहळ्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला़

The thunder of the satsang program | सत्संग कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ

सत्संग कार्यक्रमात चोरट्यांचा धुमाकूळ



उस्मानाबाद : शहरातील श्री तुळजाभवानी दूध संघासमोरील लॉन्समध्ये आयोजित सत्संग सोहळ्यात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला़ अनेक महिलांचे लाखो रुपयांच्या दागिन्यांसह भाविकांचे पॉकेट हातोहात लंपास करण्यात आले़ ही घटना रविवारी दुपारी घडली असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे़
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील तांबरी विभाग येथील सीमा सुरेश तायडे या रविवारी दुपारी जिल्हा दूध संघासमोर आलेल्या एका लॉन्सवर आयोजित सत्संग कार्यक्रमासाठी गेल्या होत्या़ दुपारी महाप्रसाद देण्यात येत असताना मोठी गर्दी झाली होती़ या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी सीमा तायडे यांच्या गळ्यातील ५० हजाराचे दोन तोळ्याचे गंठण, शारदा थोरात (राक़ौडगाव) यांच्या गळ्यातील ५० हजाराचे दोन तोळ्याचे गंठण, रतनबाई कोळगे (रा़शाहूनगर) यांंच्या गळ्यातील ४७ हजार रुपयांचे दीड तोळ्याचे गंठण असा एकूण १ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याच्या तक्रारी शहर ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत़ तर त्यानंतर उंबरे कोठा भागात राहणाऱ्या सीमा उंबरे यांनीही दीड तोळ्याचे गंठण लंपास झाल्याची तक्रार दिली आहे़
याच कार्यक्रमात महिलांच्या दागिन्यांसह अनेकांच्या खिशातील पॉकेटही चोरट्यांनी लंपास केले़ या चोरीच्या प्रकरणात महिलांच्या गर्दीत महिला चोर तर पुरूषांच्या गर्दीत पुरूष चोरटे घुसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे़ ठाण्यात अनेकांनी तक्रारीही दिलेल्या नाहीत़ सदरील प्रकरणाचा तपास पोना राठोड हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)
सत्संग कार्यक्रमाला गेल्यानंतर अनेक महिलांनी स्वत:च्या गळ्यातील दागदागिन्यांची तर पुरूषांनी खिशातील पॉकेट व इतर वस्तूंची यथायोग्य काळजी घेतली नाही़ गर्दीच्या ठिकाणी चोरीच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत़ गर्दीत लाखमोलाचे दागिने संभाळण्यात निष्काळजीपणा झाल्याने चोरट्यांनी हात साफ केल्याची चर्चाही परिसरात सुरू होती़
तुळजापूर येथील जुन्या बसस्थानकात समीर अहमद मुजावर (वय-३२ रा़सोलापूर) हे शनिवारी दुपारी थांबले होते़ उस्मानाबादकडे येणाऱ्या बसमध्ये ते चढत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पँन्टीचा खिसा कापून रोख साडेतीन हजार रूपये लंपास केले़ या प्रकरणी मुजावर यांच्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास फौजदार पठाण हे करीत आहेत़

Web Title: The thunder of the satsang program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.