तीन वॉटर प्लांट सील

By Admin | Updated: June 9, 2014 01:12 IST2014-06-09T00:34:55+5:302014-06-09T01:12:31+5:30

नांदेड : मिनरल वॉटरची नियमबाह्य पद्धतीने निर्मिती करणाऱ्या शहर परिसरातील तीन ‘वॉटर प्लांटला’ एफडीएच्या पथकाने सील ठोकले़

Three Water Plant Seal | तीन वॉटर प्लांट सील

तीन वॉटर प्लांट सील

नांदेड : मिनरल वॉटरची नियमबाह्य पद्धतीने निर्मिती करणाऱ्या शहर परिसरातील तीन ‘वॉटर प्लांटला’ एफडीएच्या पथकाने सील ठोकले़ सिडको येथील एमआयडीसी भागातील वॉटर प्लांटमधील पाणी नमुन्यात सायनाईड आढळून आल्यानंतर एफडीएने जिल्ह्यात विशेष मोहीम राबविली़
एफडीए अथवा बीआयएस यापैकी कोणताही परवाना नसताना बेधकडपणे सुरु असलेल्या तीन वॉटर प्लांटवर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली़ वाघी रस्त्यावरील विनोद तिघोटे यांच्या सुमेध इंडस्ट्रीज या कारखान्यास फक्त २० लिटर जार पुरवण्याची परवानगी आहे़ परंतु येथून ‘अ‍ॅक्वा प्लस’ नावाने पाणी पाऊच निर्मिती सुरु होती़ तसेच अन्य परवानेही काढले नसल्याचे तपासणीत निदर्शनास आले़
जुना मोंढा भागात ‘इंदर एजन्सी’ या नावाने नेहा लालवाणी यांच्याकडून विनापरवाना मिनरल वाटरनिर्मिती करण्यात येत होती़ ‘अंजली अ‍ॅक्वा’ नावाने सदरील ठिकाणी २० लिटरचे जार विकले जात होते़
शहरातील गाडीपुरा भागात अवैधरित्या सुरु असलेला मिनरल वॉटर प्लांट बंद करण्याबाबत एफडीएने दीड वर्षांपूर्वी नोटीस बजावली होती़ येथील साधनसामग्री रातोरात हलवून शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीत हा कारखाना पुन्हा थाटण्यात आला़ केटरींग गोडाऊन परिसरात सुरु असलेल्या या कारखान्यावर ८ जून रोजी अन्न सुरक्षा अधिकारी प्रवीण काळे व त्यांच्या पथकाने धाड टाकली़ येथे ‘कम फे्रश कुल वाटर’ या नावाने २० लिटरचे जार कुठल्याही परवान्याविना तयार करत असल्याचे निदर्शनास आले़ सदरील कारखाना बटुकदेव दुबे व प्रदीप कनैयालाल पुरोहित यांच्याकडून चालविण्यात येत असल्याचे एफडीएकडून सांगण्यात आले़
सिडको एमआयडीसी परिसरात बालाजी ठाकूर यांच्या ‘ओम दातार’ या कारखान्यातील पाणी नमुन्यात सायनाईड आढळले होते़ २४ मे रोजी एफडीएने हा कारखाना सील केला़ यापाठोपाठ अवैधरित्या सुरु असलेले तीन कारखाने सील केल्याने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत़ यापुढेही ही कारवाई सुरु राहील़ (प्रतिनिधी)
उन्हाळ्यात बाटलीबंद पाण्याची मागणी वाढते़ नागरिकांची गरज ओळखून पाणी पाऊच व घरगुती वापरासाठी २० लिटरचे जार अनेक कंपन्या पुरवितात़ जिल्ह्यात मिनरल वॉटर निर्मिती करणारे एकूण १७ अधिकृत प्लांट आहेत़ पाण्यातून होणारी आर्थिक उलाढाल पाहता अनेक धनदांडग्यांनी या व्यवसायात पदार्पण केले़
वॉटर प्लांट चालविण्यासाठी बीआयएस मानके, एफडीएचा परवाना, शॉप अ‍ॅक्ट, प्रदूषण नियंत्रण मंडळ आदींची परवानगी आवश्यक आहे़ सर्व नियम धाब्यावर बसवून नांदेडात सुमेध इंडस्ट्रीज, इंदर एजन्सी व कम फ्रेश कुल वाटर हे वॉटर प्लांट सुरु होते़
नियमाबाह्य पद्धतीने सुरु असलेल्या मिनरल वॉटर कारखान्यातून नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही खबरदारी घेण्यात येत नव्हती़ सील केलेले अंजली अ‍ॅक्वा, अ‍ॅक्वा प्लस व कम फ्रेश कुल वाटर ही उत्पादने ग्राहकांनी वापरु नयेत, असे आवाहन अन्न व औषधी प्रशासनाने केले आहे़

Web Title: Three Water Plant Seal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.