वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले
By Admin | Updated: January 16, 2016 23:46 IST2016-01-16T23:45:14+5:302016-01-16T23:46:01+5:30
गंगाखेड/पूर्णा: गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई सुरु केली असून या अंतर्गत शुक्रवारी रात्री गंगाखेड येथे दोन आणि पूर्णा येथे एका ट्रकवर कारवाई केली आहे.

वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक पकडले
गंगाखेड/पूर्णा: गौण खनिजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्याविरुद्ध महसूल प्रशासनाने कारवाई सुरु केली असून या अंतर्गत शुक्रवारी रात्री गंगाखेड येथे दोन आणि पूर्णा येथे एका ट्रकवर कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात वाळू ठेक्यांचे लिलाव अद्याप झालेले नाहीत. असे असतानाही वाळू धक्क्यावरुन अवैधरित्या वाहतूक सुरु आहे. गौण खनिजांची अवैध वाहतूक थांबविण्यासाठी महसूल प्रशासनाने पथकांची स्थापना केली आहे. हे पथक नदीकाठावरुन फिरत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत आहे.
गंगाखेड परिसरात तहसील प्रशासनाने अनधिकृतरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. शुक्रवारी रात्री दोन वाहने पकडून नायब तहसीलदार कदम यांनी पोलिस ठाण्यात लावली. गंगाखेड तालुक्यात गोदावरी नदीपात्रातून अनधिकृतपणे उपसा करुन रात्री-बेरात्री वाळू वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा व तहसील प्रशासनाने पथके स्थापन केली आहेत.
१२ जानेवारी रोजी मध्यरात्री उपविभागीय अधिकारी गोविंद रणवीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख श्रीरंग कदम यांनी अनधिकृत वाळू वाहतूक करणाऱ्या चार वाहनांवर कारवाई केली. १५ जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास पथकप्रमुख श्रीरंग कदम, निलेश देशमुख, काळे, पोलिस शिपाई रासवे, चालक कासले यांनी एम.एच.२२-एए ९००० या वाहनाचा पाठलाग करुन कोद्री रोडवर वाहनास पकडले होते. तर रात्री १०.२५ वाजेच्या सुमारास परळी रोडवरील बनपिंपळा शिवारात एम.एच.४३- ई ७३९३ या वाहनास पकडून पोलिस ठाण्यात लावले आहे. (प्रतिनिधी)