औरंगाबाद : लोकसभा निवडणुकीचा बंदोबस्त संपल्यामुळे रस्त्यावरील पोलीस हटल्याचे हेरून दुचाकीस्वार चोरट्यांनी शहराच्या वेगवेगळ्या भागात ३ पादचारी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून पळ काढला. बुधवारी सकाळी ६.३० ते ७.१५ वाजेच्या दरम्यान घडलेल्या ३ घटनांनी पोलीस यंत्रणेला जागे केले. विशेष म्हणजे दुचाकीस्वार चोरटे विविध ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले.
पहिली घटना : बीड बायपास वत्सलाबाई राठी (वय ८०) या बुधवारी सकाळी ६.३० वाजता अंगणात तोंड धूत होत्या. तेव्हा लाल रंगाच्या मोटारसायकलवरून दोघेजण घरासमोर आले. वत्सलाबाई मागे वळून पाहत असतानाच एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याची सोनसाखळी हिसका देत तोडली आणि तो साथीदारासह मोटारसायकलवर बसून निघून गेला.
घटना दुसरी : जळगाव रोड बायपासवर वृद्धेची सोनसाखळी हिसकावल्यानंतर चोरट्यांनी जळगाव रस्त्यालगतच्या सर्व्हिस रोडने पायी जाणाऱ्या ७२ वर्षीय पुष्पावती गोपालराव गंटा (रा. सत्यमनगर, सिडको एन-५) यांना गाठले. चोरट्याने पुष्पावती यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्रास हिसका दिला. प्रसंगावधान राखून पुष्पावती यांनी सोनसाखळी पकडली. त्यामुळे माळेतील दोन वाट्या त्यांच्या हातात राहिल्या आणि चोरटे दोन पदरी सोनसाखळी घेऊन सुसाट निघून गेले.
तिसरी घटना : सेवन हिलजळगाव रस्त्यालगतच्या विजयश्री कॉलनी कॉर्नरवर वृद्धेचे दागिने लुटल्यानंतर दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांचा मोर्चा सेवन हिल परिसरातील सुराणानगरात वळविला. सुराणानगरातील गीत टॉवर येथे राहणाऱ्या प्रमिला हरचंद भदाणे (वय ६८) नातवांना बसमध्ये बसवून त्या एकट्याच पायी घरी जात होत्या. गाडीवरील चोरटे प्रमिला यांच्या गळ्यातील २२ ग्रॅमच्या सोन्याच्या पोतीला हिसकावून घेऊ लागला. यावेळी प्रमिला यांनी प्रसंगावधान राखून गळ्यातील सोनसाखळी हातात घट्ट पकडल्याने चोरट्याच्या हातात सोनसाखळीचा ६ ग्रॅमचा तुकडा लागला.