तीन लाखांची चोरी; सराईत गुन्हेगार अटकेत
By Admin | Updated: December 30, 2015 00:44 IST2015-12-30T00:21:02+5:302015-12-30T00:44:44+5:30
वाळूज महानगर : तीन लाखांच्या चोरीप्रकरणी वाळूज पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ५०

तीन लाखांची चोरी; सराईत गुन्हेगार अटकेत
वाळूज महानगर : तीन लाखांच्या चोरीप्रकरणी वाळूज पोलिसांनी मंगळवारी (दि.२९) एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरी केलेले ५० हजारांचे सोन्याचे ब्रेसलेट जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणातील दोघा अल्पवयीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, एका फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
श्रद्धा कॉलनी येथील संतोष वडाळे यांच्या घरी चोरी करून सव्वातीन लाख रुपयांचा ऐवज लांबविण्यात आला होता.
गुप्त बातमीदाराने चोरट्यांविषयी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर कदम, फौजदार गजानन सोनटक्के, फौजदार संजय बनकर, फिरोज तडवी, शैलेंद्र अडियाल, कांबळे यांच्या पथकाने छापा मारून आरोपी नितीन राजपूत (२४, रा. अविनाश कॉलनी, वाळूज) यास शिताफीने अटक केली. राजपूतच्या ताब्यातून ५० हजार रुपयांचे सोन्याचे ब्रेसलेट जप्त करण्यात आले. यातील दोन अल्पवयीन आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून, चौथ्या फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
संतोष वडाळे हे खाजगी कंपनीत वितरक असल्यामुळे त्यांच्याकडे मोठी रक्कम असल्याची माहिती आरोपी नितीन राजपूत व त्याच्या तिघा साथीदारांना समजली होती. २७ डिसेंबरला वडाळे हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्यामुळे वडाळे यांच्यावर पाळत ठेवलेल्या आरोपींनी घराचे कुलूप तोडून कपाटीतील रोख अडीच लाख रुपये व ६५ हजार रुपयांचे दागिने लांबविले.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला नितीन राजपूत हा सराईत गुन्हेगार आहे. या टोळीकडून वाळूज व शहरातील अनेक चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी वर्तविली आहे.