पाऊणेतीन लाख बालकांचे होणार विशेष लसीकरण
By Admin | Updated: March 26, 2015 00:58 IST2015-03-26T00:38:51+5:302015-03-26T00:58:03+5:30
बीड : अतिजोखमीच्या आठ जिल्ह्यांमध्ये बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात बीडचा समावेश असून, या मोहिमेला इंद्रधनुष्य असे नाव दिले आहे

पाऊणेतीन लाख बालकांचे होणार विशेष लसीकरण
बीड : अतिजोखमीच्या आठ जिल्ह्यांमध्ये बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात बीडचा समावेश असून, या मोहिमेला इंद्रधनुष्य असे नाव दिले आहे. गुरूवारी जिल्हा रूग्णालयात अतिरिक्त संचालकांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यशाळेत मोहिमेची दिशा ठरणार आहे.
जिल्ह्यात एकूण २ लाख ७४ हजार १७४ इतकी बालके ० ते ५ वयोगटातील आहेत. त्या सर्वांना मिशन इंद्रधनुष्य मोहिमेंतर्गत ७ दिवसांची लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. गुरूवारच्या कार्यशाळेला अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील हजेरी लावणार आहेत. जिल्हाधिकारी, सीईओ, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी उपस्थित राहतील.
लसीकरण कशासाठी ?
राष्ट्रीय कुटुंब पाहणी सर्वेमध्ये गतवर्षी बीड जिल्ह्यातील बालकांच्या लसीकरणाची टक्केवारी मोठ्या प्रमाणात घसरल्याचे पुढे आले. २००८ मध्ये ७६ टक्के इतके प्रमाण होते. ते ५६ पर्यंत खाली आले. स्थलांतर, अज्ञात यामुळे लसीकरणाकडे पालकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आता इंद्रधनुष्य या मोहिमेंतर्गत प्रशासन स्वत:हून बालकांपर्यंत पोहचणार आहे. (प्रतिनिधी)