शहराला तीन दिवस निर्जळी
By Admin | Updated: June 5, 2014 01:10 IST2014-06-05T01:07:28+5:302014-06-05T01:10:21+5:30
औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत
शहराला तीन दिवस निर्जळी
औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत असून, ३ ते ५ जूनपर्यंत पुन्हा नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे की, २२ मेपासून पाणीपुरवठा योजनेवरील पंपगृहास होणारा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. त्यामुळे शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिणामी मनपाला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते आहे. पाणीपुरवठा योजनेचा वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी २ जून रोजी आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांनी महावितरणचे मुख्य अभियंता शंकर शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली. त्यामध्ये ढोरकीन पंपगृहासाठी एक्स्प्रेस फिडरची जोडणी करण्याचा निर्णय झाला. इतर पंपगृहांना अखंड वीज देण्याचे महावितरणने मान्य केले. २ जूननंतर पुन्हा लपंडाव वीजपुरवठा सुरळीत करण्याचे ठरलेले असताना महावितरणने २ जूनपासून पुन्हा विजेचा लपंडाव सुरू केला. २ जून रोजी ढोरकीन पंपगृहाचा वीजपुरवठा रात्री ८.४५ वा. खंडित झाला. त्यामुळे ३ जून रोजी शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला नाही. ३ जून रोजी सकाळी ९.३५ वा. सुरळीत करण्यात आला. ३ जून रोजी दुपारी ३.३५ वा. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला, तो वीजपुरवठा ४ जूनपर्यंत सुरळीत होऊ शकला नाही. परिणामी बुधवारी आणि गुरुवारी शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार नाही. वीजपुरवठा सुरुळीत झाल्यास शहराला येत्या तीन दिवसांत सुरळीत पाणीपुरवठा होईल. अन्यथा होणार नाही, असे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांनी कळविले आहे.