छेड काढणाऱ्या तीन रोमियोंना पकडले

By Admin | Updated: July 25, 2014 00:30 IST2014-07-24T23:37:07+5:302014-07-25T00:30:42+5:30

मंठा : येथील बसस्थानकात मुलींची छेड काढणाऱ्या रोमियोंवर पाळत ठेवून महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने तीन रोमियोंना पकडून त्यांची सिनेस्टाईल धुलाई केली.

Three of the criminals were caught by the Romans | छेड काढणाऱ्या तीन रोमियोंना पकडले

छेड काढणाऱ्या तीन रोमियोंना पकडले

मंठा : येथील बसस्थानकात मुलींची छेड काढणाऱ्या रोमियोंवर पाळत ठेवून महिला पोलिसांच्या दामिनी पथकाने तीन रोमियोंना पकडून त्यांची सिनेस्टाईल धुलाई केली. दोन मुलींना पळवून नेण्यात येत असल्याचे वृत्त्त ‘लोकमत’ ने प्रकाशित केल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली.
शहरात पहिल्यांदाच रोमियोंविरुद्ध धडक कारवाई झाल्याने पालकांमधून समाधानाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. २३ जुलै रोजी शाळा सुटल्यानंतर कर्नावळ या आपल्या गावी जाणाऱ्या दोन मुलींना आॅटोरिक्षातून पळवून नेण्याचा प्रयत्न झाला. मुलींनी प्रसंगावधान राखून रिक्षातून उडी मारून स्वत:चा बचाव केला.
त्या मुलींना ‘लोकमत’ च्या टीमने कर्नावळ या गावी नेऊन सोडले. यामध्ये सदर मुली जखमी झाल्याचे वृत्त ‘लोकमत’ द्वारे प्रकाशित होताच पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी महिला पोलिसांचे दामिनी पथक मंठा येथे पाठवून छेडछाड करणाऱ्या रोमियोंचा शोध घेऊन कारवाईचे आदेश दिले.
मंठा येथील बसस्थानक परिसरात राहुल मधुकर शिंदे (वय २४, रा. पांगरी खुर्द, ता. मंठा), ज्ञानोबा श्रीरंग खरात (वय १९, रा. खोराडसावंगी, ता. मंठा) सिद्धार्थ सखाराम घुगे (वय २६, रा. मेसखेडा, ता. मंठा) हे मुलींची छेड काढताना आढळून आले.
त्याच क्षणी दामिनी पथकातील सदस्यांनी या तिन्ही रोमियोंना पकडून चोप दिला व त्यांना मंठा पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक वाय.एस. शेख यांनी संबंधितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली. पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, अप्पर पोलिस अधीक्षक वसंत परदेशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पो.नि. अनंत कुलकर्णी, पो.नि. विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख कमल गिरी त्यांच्या सहकारी वंदना मस्के, संजीवनी गाढे, सीमा देठे, सुरेखा जाधव, मेघा नागनोत, माधुरी फुके व चालक सुरेश पाटील यांनी केली. दरम्यान, मंठा शहर व परिसरातील छेडछाडीचे प्रकार होत असल्यास पोलिसांकडे तक्रारी कराव्यात, असे कळविण्यात आले आहे.
(वार्ताहर)

Web Title: Three of the criminals were caught by the Romans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.