औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन लहानग्यांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2017 18:29 IST2017-09-05T18:02:24+5:302017-09-05T18:29:18+5:30
शहरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट लागलं आहे.

औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन लहानग्यांचा मृत्यू
औरंगाबाद, दि. 5 - शहरात गणपती बाप्पाच्या विसर्जनाला गालबोट लागलं आहे. औरंगाबादेतील बिडकीनजवळ शिवनाई तलावात बुडून तीन लहानग्यांचा मृत्यू झाला आहे. गणपती विसर्जनासाठी ही लहान मुले गेली असताना ही दुर्घटना घडली आहे. आज दुपारी 3 वाजताच्या दरम्यान ही मुलं बिडकीनजवळील शिवनाई तलावात विसर्जनासाठी गेली होती.
तलावात एकूण चार मुलं बुडाली होती. त्यातील एकाला वाचवण्यात यश आलं आहे. 12 वर्षांचा राजेश सुनील गायकवाड, 13 वर्षांचा आदित्य ताराचंद कीर्तिशाही व 14 वर्षांचा सागर सुरेश तेलभाते यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही सर्व मुलं गणपती विसर्जनासाठी फारोळा येथील शिवनाई तलावात उतरली होती. मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे फारोळा गावावर शोककळा पसरली आहे. या मुलांनी सायकलवरून गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढली होती. तलावाजवळ आल्यानंतर त्यांनी लागलीच पाण्यात उडी मारली. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यानं ही मुलं बुडाली. मुलांना पाहण्यासाठी फारोळावासीयांनी रुग्णालयात धाव घेतली. या मुलांचे आईवडील हे मजूर आहेत.