तरुणाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:04 IST2021-06-29T04:04:16+5:302021-06-29T04:04:16+5:30
औरंगाबाद : खुल्या भूखंडाच्या वादातून अमोल अशोक दांगडे (३०) याचा खून केल्याच्या आरोपाखाली शेख मोहम्मद अहेमद, शेख मोहम्मद इमरान ...

तरुणाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना जन्मठेप
औरंगाबाद : खुल्या भूखंडाच्या वादातून अमोल अशोक दांगडे (३०) याचा खून केल्याच्या आरोपाखाली शेख मोहम्मद अहेमद, शेख मोहम्मद इमरान शेख मो. उमर आणि शेख मोहम्मद इसाक याला विशेष सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी सोमवारी जन्मठेप व प्रत्येकी १० हजार रुपये दंड, तसेच चौथा आरोपी मोहम्मद फारुक शेख मो. उमर याला २ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला.
या संदर्भात इंदुबाई अशोक दांडगे (५५, डोंगरगाव ता.सिल्लोड) यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्या घराच्या बाजूला असलेल्या मोकळ्या भूखंडावरून त्यांचा आणि वरील आरोपींचा वाद सुरू होता. याबाबतचा वाद सिल्लोडच्या दिवाणी न्यायालयात प्रलंबित आहे. या भूखंडावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असे. १४ ऑगस्ट, २०१६ रोजी दुपारी सदर भूखंडावर वरील आरोपी बांधकाम करीत होते. त्यावेळी फिर्यादीची मुलगी वैशाली तेथे आली, तिने बांधकामाला विरोध करीत त्याची मोबाइलमध्ये शूटिंग केली. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी तिचे केस पकडून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केली. त्याच वेळी अमोल अशोक दांगडे (३०) हा देखील तेथे आला. आरोपींनी त्यालाही शिवीगाळ व मारहाण केली. आरोपी इसाक व इम्रान या दोघांनी अमोलचे हात पकडले, तर अहेमद याने त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. जखमी अमोलला उपचारासाठी घाटी रुग्णालयात आणले असता, त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात खून आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळी विशेष सहायक लोकअभियोक्ता शरद बांगर यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वैशाली आणि फिर्यादी, तसेच वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. सुनावणीअंती न्यायालयाने वरील तिघा आरोपींना खुनाच्या आरोपाखाली भादंवि कलम ३०२ अन्वये आणि चौथा आरोपी शेख मोहम्मद फारुक याला गंभीर मारहाण केल्याच्या आरोपाखाली भादंवि कलम ३२४ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा आणि दंड ठोठावला. ॲड.बांगर यांना ॲड.रमेश ढाकणे यांनी सहकार्य केले. पैरवी म्हणून सहायक फौजदार जे.आर. पठाण यांनी काम पाहिले.
चौकट
आरोपींना यापूर्वीही झाली शिक्षा
गुन्हा घडण्यापूर्वी ३० फेब्रुवारी, २०१६ मध्ये याच भूखंडाच्या वादावरून वरील सर्व आरोपींनी फिर्यादी इंदुबाई अशोक दांडगे हिला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली होती. त्यावरून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात तत्कालीन सत्र न्यायाधीश डी.एस. शिंदे यांनी वरील सर्व आरोपींना दोषी ठरवून १३ डिसेंबर, २०१८ रोजी शिक्षा ठोठावली होती.