शौचालय नसल्याने तिघांचे सदस्यत्व रद्द
By Admin | Updated: April 23, 2015 00:45 IST2015-04-23T00:25:29+5:302015-04-23T00:45:58+5:30
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील चोराखळी ग्रामपंचायत सरपंचासह अन्य दोन सदस्यांकडे शौचालय नसल्याने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते.

शौचालय नसल्याने तिघांचे सदस्यत्व रद्द
उस्मानाबाद : कळंब तालुक्यातील चोराखळी ग्रामपंचायत सरपंचासह अन्य दोन सदस्यांकडे शौचालय नसल्याने अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. या निर्णयाविरोधात आयुक्तांकडे अपील केले होते. मात्र, आयुक्त कार्यालयाकडूनही सदरील अपील नामंजूर करण्यात आल्याने उपरोक्त तिघांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, कळंब तालुक्यातील चोराखळी ग्रामपंचायतीचे सरपंच बाबासाहेब बळीराम साठे यांच्यासह सदस्य कांतीनाथ नरहरी साचणे व अश्विनी संभाजी मैंदाड यांच्याकडे शौचालय नसल्यामुळे १८ आॅक्टोबर २०१४ रोजी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी उपरोक्त तिघांचेही सदस्यत्व रद्द केले होते. या निर्णयाविरोधात यांनी औरंगाबाद आयुक्त कार्यालयात दाद मागितली होती. ३१ आॅक्टोबर रोजी त्यांनी अपील दाखल केले होते. दरम्यान, सदरील अपीलावर सुनावणी झाल्यानंतर ६ एप्रिल २०१५ रोजी संबंधित सदस्यांनी दाखल केलेले अपील नामंजूर केले.
तसेच यापूर्वी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय कायम ठेवला. त्यामुळे सदरील ग्रामपंचायत सदस्यांना मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम १४ (१) (ज-५) अन्वये अपात्र घोषित करण्यात आले असल्याचे अॅड. मिराजी व्यंकट मैंदाड यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे. (प्रतिनिधी)