गांधेली, कांचनवाडीतील नागरिकांना औरंगाबाद मनपाकडून पोलीस कारवाईच्या धमक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 17:43 IST2018-03-05T17:42:30+5:302018-03-05T17:43:18+5:30

गांधेलीतील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून पोलीस कारवाईच्या धमक्या देण्यात आल्यामुळे मनपाच्या विरोधात ग्रामस्थांनी दोन हात करण्याची भूमिका घेत एकतेची वज्रमूठ आवळली आहे

Threat to police action to Gandhali, Kanchanwadi citizen by Aurangabad Municipal Corporation | गांधेली, कांचनवाडीतील नागरिकांना औरंगाबाद मनपाकडून पोलीस कारवाईच्या धमक्या

गांधेली, कांचनवाडीतील नागरिकांना औरंगाबाद मनपाकडून पोलीस कारवाईच्या धमक्या

औरंगाबाद : पश्चिम मतदारसंघातील कांचनवाडी, नक्षत्रवाडी, गोलवाडी, छावणी परिषद, मिटमिटा, तीसगाव परिसरात कचरा टाकण्यास विरोध झाल्यानंतर पालिकेने गांधेलीतील खदानींच्या रिक्त जागांचा शोध घेतला असून, तेथे कचरा टाकण्याची तयारी सुरू केली आहे. याची माहिती मिळताच ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामस्थांची तातडीची बैठक झाली, बैठकीत परिसरात कचरा टाकण्यास विरोध करण्यात आला. दरम्यान, गांधेलीतील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून पोलीस कारवाईच्या धमक्या देण्यात आल्यामुळे मनपाच्या विरोधात ग्रामस्थांनी दोन हात करण्याची भूमिका घेत एकतेची वज्रमूठ आवळली आहे, तर शिवसेनेचे आ.संजय शिरसाट यांनी पश्चिम मतदारसंघात कुठेही कचरा डेपोसाठी जागा देणार नसल्याचा निर्धार करीत जनआंदोलन उभे करण्याचा इशारा रविवारी दिला. त्यांनी कांचनवाडी, नक्षत्रवाडी, गोलवाडी, छावणी परिषद, मिटमिटा, तीसगाव, गांधेली परिसरात नागरिकांच्या भेटी घेत आंदोलनाचा इशारा दिला. 

गांधेली ग्रामपंचायतीमध्ये आ.शिरसाट, माजी जि.प.अध्यक्ष आसाराम तळेकर, शहरप्रमुख विजय वाघचौरे यांच्या उपस्थितीत नागरिकांनी बैठक घेऊन कचरा डेपोला विरोध करण्याचा निर्धार करण्यात आला. शनिवारी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर व महसूल प्रशासनातील अधिकार्‍यांनी गांधेलीतील गट नं. २६३, गट नं.९५ मधील खदानींमध्ये कचरा टाकण्याच्या अनुषंगाने पाहणी केली. गट नं.२६३ पासून तलाव जवळच आहे. तेथून १५ गावांना पाणीपुरवठा केला जातो, तसेच त्या परिसरात धार्मिक स्थळे आहेत. त्यामुळे नागरिकांनी कचरा टाकण्याच्या विरोधात संघर्षाचे हत्यार उपसले आहे. 

रात्रभर पहारा दिला
च्गांधेलीतील नागरिकांनी गोलवाडीसारखा प्रकार होण्याची शक्यता असल्यामुळे फाट्यावरच कचर्‍याची वाहने अडविण्यासाठी रात्रभर पहारा देण्यासाठी तयारी केली. रविवारी रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी फाट्यावर पहारा दिला. नारायण थेटे, वसंत सावंत, शाहदखान, सरदार पटेल, शाकेर खान, उपसरपंच अमोल तळेकर, रामेश्वर नगराळे, शेख साजेद, रवी सांगळे, अभिषेक लहू, अमोल वाघमोडे, शेख उमर, सुभाष चंदनसे, सय्यद सांडू, शेख अकबर, कृष्णा थेटे, सय्यद फारुक, सचिन जाधव आदींसह शेकडो नागरिकांची बैठकीला उपस्थिती होती. 

पश्चिम मतदारसंघच दिसतो का?
आ.संजय शिरसाट यांनी पालिका प्रशासनावर तोफ डागली आहे. पश्चिम मतदारसंघातच मुद्दामहून प्रशासन भाजपच्या दबावामुळे कचरा डेपो करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप त्यांनी केला. मिटमिटा, कांचनवाडी, गोलवाडी, नक्षत्रवाडी, गांधेली, तीसगाव या भागातच रोज वाहने आणून टाकण्याचा प्रयत्न होत आहे. परिसरातील नागरिकांनी जनआंदोलन उभारून सहभागी होण्याचा निर्धार केला आहे, त्याचे नेतृत्व मी स्वत: करील, असे आ. शिरसाट म्हणाले.

Web Title: Threat to police action to Gandhali, Kanchanwadi citizen by Aurangabad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.