सव्वाचार हजार मतदारांनी निवडले ‘नोटा’

By Admin | Updated: October 20, 2014 00:32 IST2014-10-20T00:29:16+5:302014-10-20T00:32:21+5:30

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी पहिल्यांदाच मतदार यंत्रावर ‘नोटा’ (नन आॅफ द अ‍ॅबाऊ) चा पर्याय देण्यात आला आहे.

Thousands of voters choose 'Nota' | सव्वाचार हजार मतदारांनी निवडले ‘नोटा’

सव्वाचार हजार मतदारांनी निवडले ‘नोटा’


उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीमध्ये यावेळी पहिल्यांदाच मतदार यंत्रावर ‘नोटा’ (नन आॅफ द अ‍ॅबाऊ) चा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायाला जिल्ह्यातील तब्बल ४ हजार २७७ मतदारांनी पसंती दिल्याचे दिसते. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघाचा विचार केला असता, तुळजापूर मतदारसंघातील सर्वाधिक १ हजार ३१४ जणांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे समोर आले आहे.
एखाद्या मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार लायक वाटत नसल्यास अनेकजण मतदानाचा हक्क बजावत नव्हते. त्यामुळे मतदानाचा टक्काही घसरत होता. मात्र निवडणूक आयोगाने अशा मतदारांना त्यांच्या भावना मतदारांच्या माध्यमातून व्यक्त करण्यात याव्यात, यासाठी मतदान यंत्रावर ‘नोटा’ हा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघातील हजारो मतदारांनी या पर्यायाचा वापर केला आहे. उस्मानाबाद, तुळजापूर मतदारसंघामध्ये तर अपक्ष उमेदवारापेक्षाही ‘नोटा’लाच अधिक पसंती मिळाली असल्याचे दिसते.
या मतदार संघातील अ‍ॅड. रामेश्वर धोंडिबा शेटे यांना १ हजार ५१, पिंटू पांडुरंग चांदणे यांना ७६९, सुबराबाई शिवाजी राठोड यांना ६२९, संजय सुरेश रेणुके यांना ४७१, किरण जाधव यांना ४३३ तर राहुल नागनाथ जवान यांना ३८५ मते मिळाली. याच्या उलट ‘नोटा’ला १ हजार ३१४ मतदारांनी पसंती दिली.
दरम्यान, हीच अवस्था अन्य तालुक्यातही पहावयास मिळते. परंडा विधानसभा मतदारसंघातहीे १ हजार १५१ जणांनी ‘नोटा’चे बटन दाबले आहे. येथेही अपक्ष ‘नोटा’ एवढी मते घेवू शकले नाहीत. संभाजी नानासाहेब शिंदे ७७२, आर्यनराजे किसनराव शिंदे ५३६ तर अ‍ॅड. प्रबुद्धा साहेबराव अहिरे यांना ४८१ एवढी मते मिळाली. हेच चित्र उस्मानाबाद मतदार संघातही दिसते. अनेक अपक्षांना पाचशेचा आकडाही पार करता आलेला नाही. मात्र ‘नोटा’ला ६०१ इतकी मते मिळाली आहेत. उमरगा मतदार संघामध्येही यापेक्षा वेगळे चित्र नाही. येथेही तब्बल १ हजार २११ जणांनी ‘नोटा’ला पसंती दिली आहे. एकूण चारही मतदारसंघात ‘नोटा’ मिळालेल्या मतांची गोळागेरीज केली असता, हा आकडा आता ४ हजार २७७ वर जावून ठेपतो. एकूणच चारही मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणामध्ये असलेले उमेदवार उपरोक्त सव्वाचार हजारांवर मतदारांना योग्य असल्याचे वाटले नाही, हेच यातून समोर येते.

Web Title: Thousands of voters choose 'Nota'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.