साहेबांचे हजारो कार्यकर्ते रात्रीपासून परळीत उपाशीच

By Admin | Updated: June 5, 2014 00:12 IST2014-06-05T00:01:16+5:302014-06-05T00:12:30+5:30

संजय खाकरे, परळी गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी मंगळवारी दुपारपासूनच परळीत राज्यभरातून कार्यकर्ते

Thousands of Saheb volunteers saturated from Parati at night | साहेबांचे हजारो कार्यकर्ते रात्रीपासून परळीत उपाशीच

साहेबांचे हजारो कार्यकर्ते रात्रीपासून परळीत उपाशीच

संजय खाकरे, परळी गोपीनाथ मुंडे यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि आपल्या लाडक्या नेत्याला शेवटचा निरोप देण्यासाठी मंगळवारी दुपारपासूनच परळीत राज्यभरातून कार्यकर्ते आणि चाहते दाखल झाले होते. परळी शहरात व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळल्यामुळे कार्यकर्ते साहेबांसाठी उपाशी राहिले. मुंडे यांच्या निधनाचे वृत्त समजताच राज्याच्या विविध भागातून परळीकडे येणार्‍या कार्यकर्त्यांचा ओघ मंगळवारी दुपारपासूनच वाढला होता. अनेकजण बीडमध्ये तर काहीजण अंबाजोगाईमध्येही थांबले होते. संपूर्ण जिल्ह्यातच व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळल्यामुळे चहा मिळणे सुद्धा मुश्कील झाले होते, असे असले तरी केवळ आपल्या नेत्याच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित रहावे म्हणून कार्यकर्त्यांनी जमेल तेथे रात्र काढली आणि बुधवारी दिवसभरही उपाशीपोटी ते परळीत थांबून राहिले. संगमनेर येथून अंत्यसंस्कारासाठी आलेल्या कैलास फड यांनी आपण आल्यापासून उपाशीच असल्याचे सांगितले. परंतु आपल्या लाडक्या नेत्याच्या निधनामुळे झालेले दु:खही लपत नव्हते. नगर जिल्ह्यातून आलेले बंडू फड यांनीही आपला संपूर्ण दिवस अवघ्या एका बिस्कीटावर काढला. ग्रामीण भागातून आलेल्या ज्ञानेश्वरी केंद्रे या महिलेचेही काहीशी अशीच अवस्था होती. अनेक महिला कारखानास्थळावर अक्षरश: हंबरडा फोडताना दिसत होत्या. त्यांच्या दु:खाला पारावार नव्हता. परळी शहरात दुसर्‍या दिवशीही बाजारपेठा बंदच असल्यामुळे बाहेरगावावरून आलेल्या कार्यकर्त्यांना पिण्याचे पाणी सुद्धा मिळणे मुश्कील झाले होते. शहरातील आझाद चौक ते वैद्यनाथ कारखाना या मार्गावर पहाटे पासूनच लोकांची गर्दी झाली होती, कारखाना परिसरात अक्षरश: जनसागर उसळला होता. कारखाना परिसरातील विविध इमारतींवर लोकांनी गर्दी केली होती. मुंडे यांच्या परळी शहरातील शिवाजी चौकातील यशश्री बंगल्यावर चाहत्यांची गर्दी झाली होती. ‘गोपीनाथ मुंडे अमर रहे’ अशा घोषणांनी संपूर्ण शहरच दणाणून गेले होते. गोपीनाथ मुंडे हा आमचा नेता होता. शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवित असे, कर्ज घेण्यासाठी कारखान्याकडूनही सहकार्य करत असे. आमच्या सुख- दु:खात सहभागी होणारा असा नेता आता आम्हाला मिळणार नाही, असे म्हणत एका महिलेने ‘आमचा गोपीनाथ कुठे गेला?’ असा हंबरडाच फोडला.

Web Title: Thousands of Saheb volunteers saturated from Parati at night

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.