हजारो क्विंटल धान्य उघड्यावर

By Admin | Updated: June 6, 2014 01:07 IST2014-06-06T00:11:10+5:302014-06-06T01:07:15+5:30

धर्माबाद : येथे नाफेड केंद्राअंतर्गत तूर व हरभरा या पिकाची पंधरा हजार क्विंटलपेक्षा जास्त मालाची खरेदी झाली़ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही

Thousands of quintals open on the grain | हजारो क्विंटल धान्य उघड्यावर

हजारो क्विंटल धान्य उघड्यावर

धर्माबाद : येथे नाफेड केंद्राअंतर्गत तूर व हरभरा या पिकाची पंधरा हजार क्विंटलपेक्षा जास्त मालाची खरेदी झाली़ दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ उलटूनही शेतकर्‍यांना अद्याप मालाचे पैसे मिळाले नाहीत़ शिवाय हा माल उघड्यावरच असल्याने पावसाने भिजण्याची शक्यता आहे़
तालुक्यातील २८१ शेतकर्‍यांनी या केंद्रावर ३८०२ क्विंटल तुरीची विक्री केली होती़ यापैकी २७९० क्विंटल तुरीचे ४ हजार ३०० रुपये दराने १ कोटी १९ लाख ९७ हजार रुपये वाटप करण्यात आले़ मात्र १०१३ क्विंटलचे ४३ लाख ५१ हजार रुपये अद्यापही थकले आहेत़ माल विक्री करुनही पैसे पदरी पडले नसल्याने शेतकर्‍यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे़
हरभरा खरेदी केंद्रावर २२७ शेतकर्‍यांनी ११ हजार दोनशे क्विंटल हरभर्‍याची विक्री केली़ याचे अडीच कोटी रुपये अद्याप वितरीत झाले नाहीत़ व्यापार्‍यांपेक्षा शासनाकडून मालाला चांगली किंमत येत असल्याने शेतकर्‍यांनी मोठ्या आशेने तूर, सोयाबीन नाफेडच्या केंद्रावर विक्रीसाठी आणले़ मात्र खरेदी-विक्री संघाच्या ढिसाळ नियोजनामुळे आलेल्या मालाचे मोजमाप मुदतीत केले नाही़ त्यामुळे माल खरेदी केला जातो की नाही? अशी शंका शेतकर्‍यांना आली़ त्यावर मार्केट कमिटीचे सभापती गणेशराव पाटील करखेलीकर व संचालकांनी सर्व शेतकर्‍यांचा माल नोंदणीप्रमाणे खरेदी करावा अन्यथा उपोषणाचा पवित्रा घेतला़ त्यामुळे माल खरेदीसाठी वाढीव मुदत मिळाली़
शेतकर्‍यांचा हरभरा तोल करुन रिपोर्ट, वखार पावती मुख्य कार्यालयाकडे पाठविण्यास विलंब होत आहे़ त्यामुळे हजारो क्विंटल माल रस्त्यावर पडून आहे़ दोन दिवसात मृग नक्षत्र सुरु होत आहे़ अशावेळी पाऊस झाल्यास रस्त्यावरील हजारो क्विंटल माल भिजण्याची शक्यता नाकारता येत नाही़ पेरण्या अवघ्या काही दिवसांवर आहेत़ माल विक्रीचे पैसे अद्याप हाती पडले नसल्याने बी-बियाणे, खत अन्य साहित्य विकत घ्यायचे कसे? असा प्रश्न शेतकर्‍यांना पडत आहे़ नाफेडने खरेदी केलेल्या मालाचे पैसे तात्काळ उपलब्ध करुन द्यावेत, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा मार्केट कमिटीवर गेलेल्या शेतकरी मंडळाने दिला आहे़ (वार्ताहर)
२४ तासात पैसे द्या
शेतकर्‍यांचा माल खरेदी केल्यानंतर चोविस तासाच्या आत पैसे वितरीत करण्याची सूचना शासनाने दिली होती़ परंतु दोन महिने लोटले तरी तुर, हरभर्‍याचे पैसे मिळत नाहीत़ यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़

Web Title: Thousands of quintals open on the grain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.