हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागा धोक्यात !

By Admin | Updated: November 16, 2014 00:36 IST2014-11-16T00:32:11+5:302014-11-16T00:36:55+5:30

भूम : अल्प पाऊस व मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने असणाऱ्या ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जिल्हाभरातील हजारो

Thousands of hectare grape plantation danger! | हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागा धोक्यात !

हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागा धोक्यात !


भूम : अल्प पाऊस व मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने असणाऱ्या ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जिल्हाभरातील हजारो हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. एकट्या भूम तालुक्यात ९०४ हेक्टरवर द्राक्षबागा आहेत.
तालुक्यात अलीकडच्या काळात मोसमी शेतीसोबत शेतकरी द्राक्ष बागेकडे वळला आहे. तालुक्यात जवळपास ९०४ हेक्टर द्राक्षबागेचे क्षेत्र असून, खास भूम मंडळास क्षेत्र अधिक आहे. परंतु मागील पाच-सहा वर्षात क्षेत्र जरी वाढले असले तरी अत्यल्प पाऊस व ढगाळ हवामान सातत्याने पडत असून, तर गतवर्षी अवकाळीचा फटका तर यंदा सध्या गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागेस ढावणी, बुरी, करपा या रोगाने परेशान केले असल्याने दर महिन्याला २० हजार अतिरिक्त खर्च फवारणीसाठी करावा लागत असल्याचे चित्र आहे. सध्या द्राक्ष बागेची आॅक्टोबर महिन्यात छाटणी झाली. यासाठी एकरी १० हजार रुपये खर्च झाला आहे. सध्या बागा फुलोऱ्यात असताना अधून-मधून पडणारा पाऊस व ढगाळ हवामान, सुटणारे वारे यामुळे घडाचे मनी गळत आहेत. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या छाटणीनंतर पाऊस झाल्यास बागास धोका होवू शकतो. त्यानुसार १३ नोव्हेंबर रोजी चिंचपूर परिसरात चांगला पाऊस झाल्याने द्राक्ष बागांच्या घडाचे मनी गळत असल्याने नुकसान होत असल्याचे चित्र आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास द्राक्षबागा जगविणे अवघड असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.
दरम्यान, हवामान खराब झाल्यावर दरवर्षी थोड्याफार प्रमाणात फटका बसतो. परंतु यंदा मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामान व झालेला पाऊस यामुळे फवारणी खर्च वाढला आहे. साधारण एक एकर द्राक्ष बागेसाठी दीड लाख रुपये खर्च माल तयार होईपर्यंत लागतो. परंतु यंदा अत्यल्प पाऊस, त्यानंतर मशागत खर्च, छाटणी खर्च तर आता ढगाळ हवामान व पाऊस यामुळे गतवर्षीच्या तुलनेत खर्च अधिक वाढला आहे. यावर्षी अधिक भाव मिळाला तरच हाती काहीतरी येईल, अन्यथा शेतकरी आर्थिक संकटात सापडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी २० ते ४० रुपयापर्यंत भाव होता. त्या तुलनेत यावर्षी ५० रुपये असल्याचेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यात चिंचपूर ढगे, वालवड, सामनगाव, चिंचोली, भूम परिसर, हिवरा, हाडोंग्री, दिंडोरी, उळूप, पाठसांगवी, राळेसांगवी या भागात द्राक्षबागा अधिक आहेत.
मागील आठवडाभरापासून सातत्याने ढगाळ हवामान व चिंचपूर परिसरात पाऊस झाल्याने द्राक्ष बागेच्या घडाचे मनी गळत आहेत. तर खराब हवामानाचा फटका बसत असल्याने फवारणीसाठी महिन्याला २० हजार अतिरिक्त खर्च वाढत आहे. तर दिवसातून दोन वेळेस फवारणी करण्याची वेळ आली असल्याचे चिंचपूर येथील द्राक्ष बागायतदार अजित रामदास ढगे यांनी सांगितले.
यावर्षी अत्यल्प पाऊस, त्यात कशीबशी बाग जोपासली. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून बाग फुलोऱ्यात असताना पडणारा पाऊस व खराब हवामानाचा फटका गतवर्षीच्या तुलनेत औषध फवारणीचे भाव दुपटीने वाढल्याने बागेचे संगोपन करता करता आर्थिक तोटा होत असल्याचे धनंजय मस्कर यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Thousands of hectare grape plantation danger!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.