माती परीक्षणाकडे हजारो शेतकर्यांनी फिरविली पाठ
By Admin | Updated: June 1, 2014 00:25 IST2014-05-31T23:54:20+5:302014-06-01T00:25:30+5:30
चापोली : पीकवाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे.

माती परीक्षणाकडे हजारो शेतकर्यांनी फिरविली पाठ
चापोली : पीकवाढीसाठी अत्यंत महत्त्वाच्या घटकांमध्ये जमीन हा एक महत्त्वाचा घटक आहे. जमिनीमध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत, हे जर कळाले तर सुयोग्य व्यवस्थापन, तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढविता येते. मात्र शेतकर्यांची उदासीनता व माती परीक्षण संदर्भातील जनजागृतीअभावी चापोली परिसरातील हजारो शेतकर्यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. भरघोस उत्पादन वाढीसाठी जमिनीची सुपिकता सांभाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकाच्या चांगल्या वाढीसाठी नत्र, स्फुरद व पालाश या प्रमुख अन्न घटकांची गरज असते. ही गरज रासायनिक खताद्वारे पुरविली जाते. प्रमाणशीर खते नाही दिल्यास पिके चांगली येत नाहीत. परिणामी, अनावश्यक खर्चात वाढ होते. माती परीक्षणाने पिके वाढीसाठी जे आवश्यक घटक आहेत, त्यांचे जमिनीमधील प्रमाण कळते. त्यानुसार जे घटक जमिनीमध्ये कमी प्रमाणात आहेत, त्याच घटकांचा पुरवठा केल्यास बचत होईल व उत्पन्नही वाढेल. शेतकरी हा पूर्णत: निसर्गावर अवलंबून असतो. दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे गणित चुकते. जेवढा पैसा घातला आहे, तेवढाही निघत नाही व पुढील हंगामासाठी परत कर्जबाजारी होऊन खत-बियाणे घ्यावे लागतात. मागील तीन ते चार वर्षांचा विचार केला तर आज खताचे भाव दुपटीने वाढले आहेत. जर शेती तंत्रशुद्ध पद्धतीने केली तर अनावश्यक खर्चाला लगाम लागू शकतो. त्यासाठी जर शेतकर्यांनी माती परीक्षण केले तर जे घटक जमिनीत कमी प्रमाणात आहेत, तेवढ्याच घटकाचा पुरवठा केला तर खतावरील अनावश्यक खर्च टाळला जाईल व पिकाच्या उत्पादनातही मोठ्या प्रमाणात वाढ होईल. लातूर येथे माती परीक्षणाची प्रयोगशाळा असून, मातीमधील तीन घटक तपासणीसाठी २५ रुपये, विशेष १६ घटकांच्या तपासणीसाठी २०० रुपये शुल्क आकारले जाते. खतावरील अनावश्यक खर्चाचा विचार केला तर हे शुल्क कमी आहे. मात्र शेतकर्यांची उदासीनता व जनजागृतीच्या अभावामुळे माती परीक्षणाकडे पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर) माती परीक्षणाबाबत जनजागृती करू... कृषी विभागाच्या वतीने माती परीक्षणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून केले जात आहे. परंतु, याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती न केल्यामुळे शेतकर्यांनी माती परीक्षणाकडे पाठ फिरविली आहे. परंतु, याबाबत ग्रामसभेत बैठक घेऊन सोमवारपासून जनजागृती करणार असल्याचे कृषी सहायक एच.डी. रोकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.