‘त्या’ बहिणींना मिळाले हक्काचे घर
By Admin | Updated: August 5, 2016 00:12 IST2016-08-05T00:05:56+5:302016-08-05T00:12:19+5:30
ढोकी : आई-वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता हिंमतीने मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या गोवर्धनवाडी येथील बहिणींना मदत करण्यासाठी मदतीचा ओघ सुरूच आहे.

‘त्या’ बहिणींना मिळाले हक्काचे घर
ढोकी : आई-वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता हिंमतीने मोलमजुरी करून शिक्षण घेणाऱ्या गोवर्धनवाडी येथील बहिणींना मदत करण्यासाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. गुरूवारपर्यंत सुमारे तीन लाखापर्यंतची मदत या बहिणींच्या खात्यावर जमा झाली असून, मूळ गोवर्धनवाडीचे रहिवासी असलेल्या नानासाहेब वळेकर यांनी त्यांचे घर गुरूवारी या बहिणींच्या नावे करून दिले.
गोवर्धनवाडी येथील निकिता आणि पूजा या बहिणी आई-वडिलांच्या मृत्यूनंतर दोघीच एकत्रित राहत असून, आठवड्यातील काही दिवस मजुरी करून त्या शिक्षण घेत आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या बहिणींचा हा संघर्ष ‘लोकमत’ने समाजसमोर आणला. आणि या बहिणींना मदतीसाठी पुढाकार घेण्याचेही आवाहन केले. ‘लोकमत’च्या या आवाहनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्रतिसाद मिळाला. मागील काही दिवसांपासून ‘लोकमत’ कार्यालयात दूरध्वनी करून अनेकजण या बहिणींच्या मदतीची इच्छा व्यक्त करीत आहेत. अनेकांनी या बहिणींचा पत्ता ‘लोकमत’ कार्यालयातून घेऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्यांना मदतही केली. गुरूवारी पाटोदा येथील सरपंच बाळासाहेब देशमुख, अंबाजोगाई येथील मानवलोक संस्थेचे कार्यवाह अनिकेत लोहिया, तसेच होळणा नदी पुनर्जीवन समितचे अध्यक्ष गोविंद जामदार, यांच्यासह समीर पठाण, नवनाथ गाढवे, राजाभाऊ कदम, गजानन पोतदार यांनी या बहिणींची भेट घेऊन त्यांच्या खात्यावर रोख रक्कम जमा केल्याने मदतीचा आकडा आता तीन लाखांवर गेला आहे.
दरम्यान, मूळचे गोवर्धनवाडी येथील नानासाहेब भागवत वळेकर यांनी गोवर्धनवाडी येथील १०८९ चौरस फुटाचे राहते घर या बहिणींच्या नावे केले आहे. याबाबतची प्रक्रिया गुरुवारी पार पाडण्यात आली. नानासाहेब वळेकर हे गोवर्धनवाडी येथील असले तरी सध्या ते दौंड येथे स्थायिक झाले असून, त्यांचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. नानासाहेब यांच्या लहानपणीच त्यांच्या वडिलांचेही निधन झाले होते. त्यानंतर काही वर्षांनी अल्पशा आजाराने आईचाही मृत्यू झाला. त्यामुळे नानासाहेबांचा सांभाळ त्यांच्या दौंड येथील आजी व आत्यानेच केला आहे. तेथेच मोठे झाल्यानंतर ते आजीचा भाजी विक्रीचा व्यवसाय सांभाळू लागले. कालांतराने या व्यवसायात त्यांनी चांगला जम बसविल्याने ते दौंड येथेच स्थायिक झाले. निकिता आणि पूजा यांच्या संघर्षाची कहाणी सरपंच विनोद थोडसरे यांनी नानासाहेबांपर्यंत पोहोंचविल्यानंतर मी स्वत: आई-वडिल नसल्यानंतरच्या वेदना सोसल्या आहेत. आज कष्ट करून मी उभा आहे. निकिता आणि पूजा यांना हक्काचे घर मिळणे आवश्यक असल्याने गोवर्धनवाडी येथील घर मी त्यांच्या नावे करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आणि त्यानुसार सदर घर या बहिणींच्या नावे करण्यात आल्याने आता या बहिणींना हक्काचा निवारा मिळाला आहे. (वार्ताहर)