‘त्या’ घरफोड्यांचा तपास शुन्यच!
By Admin | Updated: September 18, 2014 00:40 IST2014-09-18T00:33:49+5:302014-09-18T00:40:16+5:30
रमेश शिंदे , औसा मागील महिनाभरात औसा शहरात पाच ते सहा घरफोड्या भरदिवसा झाल्या़ तर एका कापड दुकानातून ग्राहक बनू आलेल्या महिलेने ५० हजार रूपये घेऊन पळ काढला़

‘त्या’ घरफोड्यांचा तपास शुन्यच!
रमेश शिंदे , औसा
मागील महिनाभरात औसा शहरात पाच ते सहा घरफोड्या भरदिवसा झाल्या़ तर एका कापड दुकानातून ग्राहक बनू आलेल्या महिलेने ५० हजार रूपये घेऊन पळ काढला़ तर दोन दिवसांमधून ठराविक दिवसाच्या अंतराने जवळपास सहा ते सात लाख रूपयांच्या दागिण्यांची चोरी झाली़ जून महिन्यात नागरसोगा येथे ७ लाखांच्या दागिण्यांची चोरी झाली़ परंतु, या चोऱ्यांचा तपास शुन्यातच असल्याने औसा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभारले आहे़
औसा तालुक्यात मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागातही चोऱ्यांचे सत्र सुरु आहे़ शहरात तर मागील महिनाभरपासून भर दुपारीच घरफोडीची मालिकाच सुरु झाली आहे़ अनेकवेळा लहानसहान चोऱ्या होतात़ अशावेळी नको ती पोलिसांची झंजट म्हणून पोलिसाकडे तक्रार करण्याचे नागरिक टाळतात़ पण मोठी चोरी झाल्यानंतर मात्र पोलिसात गुन्हे नोंद होतात़ मागील महिनाभरात फक्त औसा शहरात पाच ते सहा घरफोड्या भर दुपारी झाल्या़ तर अन्य एका ठिकाणी भरदुपारीच एका दुकानदाराच्या गल्ल्यातील पैैसे पळविले़ यामध्ये दोन ते तीन गुन्हे नोंद आहेत़ यामधील दुकानामध्ये चोरी केलेल्या महिलेला पकडल्याचे पोलिस सांगतात़ पण साडेतीन ते चार लाखांची एक व पावणेतीन लाखांची एक अशा दोन घरफोड्यांचा तपास लावण्यात औसा पोलिसांना अजूनही यश मिळाले नाही़
जून महिन्यात नागरसोगा येथे मोहन मुसाडे यांचे घर फोडून चोरट्यांनी सात लाखांचे दागिणे व ३० हजार रूपये रोख लंपास केल्याची घटना घडली़ पंधरा दिवसापूर्वी गौरीशंकर मिटकरी, तर आठ दिवसापूर्वी अनिल मुळे यांचे घर भरदुपारी फोडून आठ लाखांचा ऐवज लांबविण्यात आला़ काहीवेळा नागरिक पोलिसांची नुसती झंझट नको म्हणून तक्रारी देणे टाळतात़ ज्यांनी तक्रारी दिल्या त्यांचा तक्रारींचा तपास लागत नसल्याने औसा तालुक्यातील पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़