तेरचा आठवडी बाजार चिखलात
By Admin | Updated: July 29, 2014 01:09 IST2014-07-29T00:20:42+5:302014-07-29T01:09:11+5:30
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला समस्यांचे ग्रहण लागले आहे़

तेरचा आठवडी बाजार चिखलात
तेर : उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे सोमवारी भरणाऱ्या आठवडी बाजाराला समस्यांचे ग्रहण लागले आहे़ त्यात सोमवारी रिमझिम पाऊस झाल्याने चिखलात बसून व्यापाऱ्यांना मालाची विक्री करावी लागली़ तर चिखल तुडवतच नागरिकांना खरेदी करावी लागली़ आठवडी बाजारात इतर समस्याही आ वासून उभ्या आहेत़
तेर येथील आठवडी बाजारात तेरसह पळसप, भंडारवाडी, रामवाडी, इर्ला, वाणेवाडी, डकवाडी, कोळेवाडी, हिंगळजवाडी, मुळेवाडी, पवारवाडी, थोरसवाडी, गोवर्धनवाडी, बुक्कनवाडी आदी गावातील शेतकरी माळवे घेऊन विक्रीसाठी येतात़
परिसरातील लोक येथील आठवडी बाजारात खरेदीसाठीही मोठ्या प्रमाणात येतात़ येथील आठवडी बाजारात नागरिकांना बसण्यासाठी व्यवस्थित जागा नाही़ पाण्यासह इतर मुलभूत सुविधांचाही येथे मोठा अभाव आहे़ सोमवारी सकाळपासूनच तेर व परिसरात रिमझिम पाऊस सुरू होता़ त्या पावसामुळे आठवडी बाजारात सर्वत्र चिखल झाला होता़ मुळातच सर्वत्र माती असलेल्या या जागेवर पावसामुळे मोठा चिखल निर्माण झाला होता़ त्यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकरी, नागरिकांना चिखालातूनच आठवडी बाजार करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे़ आठवडी बाजारात वारंवार उद्भवणाऱ्या समस्या ग्रामपंचायतीने सोडवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे़ (वार्ताहर)