५० टक्क्यांवर शाळा ‘थर्ड क्लास’ !
By Admin | Updated: May 21, 2015 00:29 IST2015-05-21T00:27:24+5:302015-05-21T00:29:27+5:30
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद एकीकडे शिक्षणावर वर्षाकाठी कोट्यवधी खर्च होत आहे. तर दुसरीकडे गुणवत्तेचा खेळखंडोबा झाला आहे. पैशाअभावी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी

५० टक्क्यांवर शाळा ‘थर्ड क्लास’ !
बाबूराव चव्हाण , उस्मानाबाद
एकीकडे शिक्षणावर वर्षाकाठी कोट्यवधी खर्च होत आहे. तर दुसरीकडे गुणवत्तेचा खेळखंडोबा झाला आहे. पैशाअभावी ग्रामीण भागातील शेतकरी, कष्टकरी, मजूर मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून थोड्याथोडक्या नव्हे, तर तब्बल १ हजार ९४ शाळा चालविल्या जातात. यापैकी केवळ ३७ शाळांना ‘अ’ श्रेणी मिळाली. तर सुमारे पन्नास टक्क्यांवर म्हणजेच ६१९ शाळांच्या प्रगती पुस्तकावर ‘थर्ड क्लास’चा शिक्का बसला आहे. ही बाब ना पुढाऱ्यांना ना अधिकाऱ्यांसाठी भूषणावह आहे !
जिल्हा परिषदेतील बैठका असोत की सभा. अशावेळी अधिकाऱ्यांपासून ते सत्तेच्या खुर्चिवर बसलेली मंडळी गुणवत्तेच्या नावाने गळा काढतात. परंतु, त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होताना दिसत नाहीत. काही महिन्यांपूर्वी गुणवत्ता वाढीच्या अनुषंगाने काही पाऊले उचलली गेली होती. परंतु, त्याबाबतीतही ‘नव्याचे नऊ दिवस’ या म्हणीचा अनुभव आला. प्रत्येक महिन्याला विषय समितीची बैठक होते. अशा बैठकांमध्ये ‘कंपाऊंड वॉल बांधकाम, फरशी बसविणे, गुळती दुरूस्त करणे’ यासह आदी बाबींवरच अख्खी बैठक चालते. गुणवत्तेवर मात्र, अपवादानेच चर्चा होते. त्यासाठी काही मिनिटांचाच वेळ मिळतो, हे विशेष. या अशा धोरणांमुळेच गुणवत्तेचा आलेख अपेक्षित गतीने उंचावताना दिसत नाही. शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या गुणवत्ता विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांचे मुल्यमापन करण्यात आले. सदरील मुल्यमापन अहवालातून धक्कादायक चित्र समोर आले आहे.
जिल्हाभरातील १ हजार २९ शाळांचे २०१४-२०१५ मध्ये मुल्यमापन करण्यात आले. त्यापैकी केवळ ३७ शाळांना ‘अ’ श्रेणी (फस्ट क्लास) मिळाला आहे. या शाळांनी ९० ते १०० टक्क्यांदरम्यान गुण संपादन केले आहेत. तर दुसरीकडे पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच ६१९ शाळांना ‘क’ श्रेणी (थर्ड क्लास) मिळाली आहे. तसेच ४३४ शाळांच्या प्रगतीपुस्तकावर ‘ब’ श्रेणीचा शिक्का पडला आहे. ‘अ’ श्रेणी मिळविलेल्या शाळांची संख्या तुळजापूर तालुक्यात अधिक आहे. १२ शाळांना ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. तर दुसरीकडे लोहारा आणि उस्मानाबाद तालुक्यांची पिछेहाट झाली आहे. प्रत्येकी एकेक शाळेच्या प्रगती पुस्तकावर ‘अ’ श्रेणीचा शिक्का बसला आहे. भूम तालुक्यातही समाधानकारक स्थिती नाही. केवळ दोनच शाळांना ‘अ’ श्रेणी मिळू शकली. तर दुसरीकडे परंडा तालुक्याने भूमला ‘ओव्हरटेक’ केले आहे. सात शाळांना ‘फर्स्ट क्लास’ मिळाला आहे. उमरगा तालुक्याची स्थितीही भूमप्रमाणेच आहे. दरम्यान, वाशी तालुक्यातील चार तर कळंब तालुक्यातील तीन शाळांना ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. हे चिंताजनक चित्र पाहिल्यानंतर किमान येत्या शैक्षणिक वर्षापासून तरी गुणवत्ता वाढीसाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी पालक वर्गातून व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्रा.) शिवाजी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता , गतवर्षीच्या तुलनेत यंदा ‘अ’ श्रेणी प्राप्त शाळांची संख्या वाढल्याचे सांगितले. २०१२-१३ मध्ये ०४, २०१३-१४ मध्ये ०७ तर २०१४-१५ मध्ये ३७ शाळांना ‘अ’ श्रेणी मिळाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून गुणवत्ता वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.