|
सेलू : जे समोर दिसते, ते सर्वज्ञात असते. मात्र दृश्य बाबीच्या पलीकडे जाऊन त्याच्या विविध अंगाचा वेगवेगळ्या पद्धतीने केलेला विचार हा संशोधनाचा पाया असला पाहिजे, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांनी केले. नूतन महाविद्यालयात स्वारातीम विद्यापीठाच्या अविष्कार संशोधन महोत्सवाचे उद््घाटन कुलगुरु डॉ.पंडित विद्यासागर यांच्या हस्ते बुधवारी झाले. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. एस. एम. लोया हे होते. व्यासपीठावर प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, अविष्कार जिल्हा समन्वयक डॉ. सुनील मोडक, डॉ. सरकटे, डॉ. जेवे, डॉ. एम. एस. शिंदे, डॉ. महेंद्र शिंदे, अमोल मगर यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना संशोधनाची ओळख व्हावी, या हेतुने सुरु केलेला अविष्कार महोत्सव फलदायी ठरत असून विद्यार्थ्यांचाही प्रतिसाद मिळत असल्याचे नमूद करीत विद्यासागर म्हणाले, संशोधन आधारित अध्यापन पद्धतीची आवश्यकता आहे. संशोधनाची आवड असेल तर सवड आपोआप मिळते. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक चिकित्सक वृत्ती, कुतूहल अंगी बाळगून संशोधनाकडे अधिक लक्ष देणे अधिक गरजेचे आहे. आज देशात संशोधनाच्या अनेक संधी, संस्था, अर्थसहाय्य उपलब्ध आहे. याचा फायदा घेऊन येणार्या संकटाचा खंबीरपणे सामना करुन समाजासाठी जे काही करता येईल, त्यासाठी प्रयत्न व्हावा, अशी अपेक्षा डॉ.विद्यासागर यांनी व्यक्त केली. मेघना जोशी हिने स्वागत गीत सादर केले. डॉ. निर्मला पद्मावत यांनी निवेदन सादर केले. सूत्रसंचालन डॉ. उत्तम राठोड तर डॉ. महेंद्र शिंदे यांनी आभार मानले. /(प्रतिनिधी) |