दुचाकी चोरणाऱ्या तिघांना कोठडी
By Admin | Updated: April 23, 2015 00:46 IST2015-04-23T00:26:43+5:302015-04-23T00:46:16+5:30
उस्मानाबाद : शहरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी मंगळवारी पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

दुचाकी चोरणाऱ्या तिघांना कोठडी
उस्मानाबाद : शहरातून दुचाकींची चोरी करणाऱ्या तिघांना शहर पोलिसांनी मंगळवारी पुणे पोलिसांकडून ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. या तिघांनाही एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, हाडपसर पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्यात तिघांना अटक केली होती. याच लोकांनी उस्मानाबादसह इतर ठिकाणाहून दुचाकींचीही चोरी केल्याचे हाडपसर पोलिसांच्या तपासादरम्यान उघडकीस आले. यावरून त्यांनी काही दुचाकीही जप्त केल्या. ही माहिती समजल्यानंतर उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने न्यायालयाच्या परवानगीनंतर पुणे येथे जावून राजेश ऊर्फ राजा शंकर राठोड (वय २३, रा. पश्चिम तांडा, जेवळी, ता. लोहारा), चेतन अशोक बेलुरे (वय १९, रा. हाडपसर, पुणे) आणि अनंता मनोज भडकवाड (रा. तालुका पुरंदर, जि. पुणे) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून उस्मानाबाद शहरातील समता नगर भागातून चोरीस गेलेली डांगे यांची एक दुचाकीही जप्त करण्यात आली.
या तिघांनाही बुधवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या या तिघांकडून चोरीस गेलेल्या आणखी दुचाकी मिळण्याची शक्यता असून, या अनुषंगाने शहरातून दुचाकी चोरीस गेलेल्या नागरिकांनी शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन या घटनेचे तपासीक हवालदार एस. डी. सूर्यवंशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)