शहरात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना
By Admin | Updated: December 23, 2014 00:29 IST2014-12-23T00:29:57+5:302014-12-23T00:29:57+5:30
औरंगाबाद : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ काही थांबण्यास तयार नाही. मोंढ्यात पोलीस चौकीच्या बाजूचीच चार दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ थांबेना
औरंगाबाद : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ काही थांबण्यास तयार नाही. मोंढ्यात पोलीस चौकीच्या बाजूचीच चार दुकाने फोडल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी राधास्वामी कॉलनीत एक घरफोडी, जिन्सी शाळेत चोरी केल्याचे, तर जालना रोडवरून मोबाईल हिसकावून नेल्याचे आणि नागसेन कॉलनीतून दुचाकी लंपास केल्याच्या घटना घडल्या.
राधास्वामी कॉलनीतील योगेश शेलार हे घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. सकाळी ते गावाहून परत आले तेव्हा घराचे कुलूप तुटलेले आणि घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले त्यांच्या नजरेस पडले.
चोरट्यांनी घर फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे ४० हजारांचा ऐवज पळविल्याचे लक्षात येताच शेलार यांनी बेगमपुरा ठाण्यात धाव घेतली.
वेळ विचारली अन्...
दुसरी घटना गजबजलेल्या जालना रोडवरील चुन्नीलाल पंपासमोर घडली. पुष्पराज अपार्टमेंटमधील रहिवासी योगेश खोसरे हे रात्री दुचाकीवरून जात असताना त्यांना फोन आला. त्यामुळे चुन्नीलाल पंपाजवळ त्यांनी दुचाकी उभी केली. एका मोबाईलवर ते बोलू लागले. तर त्यांच्या दुसऱ्या मोबाईलमधील सीमकार्ड बदलू लागले. त्याच वेळी दुचाकीवर दोन अनोळखी व्यक्ती आले. ‘किती वाजले’ असे त्यांनी विचारले. योगेशने वेळ सांगताच दोघांपैकी एकाने हिसका मारून योगेश यांच्या हातातील १६ हजारांचा मोबाईल हँडसेट हिसकावला आणि दुचाकीवर धूम ठोकली. या चोरीप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. ४
जिन्सी परिसरातील एका स्कूललाही रात्री चोरट्यांनी लक्ष्य केले. शाळेतील मुख्याध्यापकांच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत असलेला डिजिटल कॅमेरा, इंटरनेटचे डोंगल, असा हजारो रुपयांचा ऐवज चोरून नेला.
४या चोरीप्रकरणी इलियास अहेमद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ४
तसेच वाहन चोरीचीही एक घटना घडली. नागसेन कॉलनीत फय्याजोद्दीन अन्सारी यांनी आपली दुचाकी (क्र. एमएच-१९ के- ५८३२) घरासमोर उभी केली होती. मध्यरात्री चोरट्यांनी संधी साधून ती चोरून नेली. या चोरीप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.