राजे संभाजी कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:04 IST2021-05-28T04:04:17+5:302021-05-28T04:04:17+5:30

रात्री अडीच तासात फोडली ६ बंद घरे हर्सूल परिसरात दहशत: घर फोडून लाखोंचा ऐवज पळविला औरंगाबाद: हर्सूल परिसरातील ...

Thieves roam in Raje Sambhaji Colony; | राजे संभाजी कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ;

राजे संभाजी कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ;

रात्री अडीच तासात फोडली ६ बंद घरे

हर्सूल परिसरात दहशत: घर फोडून लाखोंचा ऐवज पळविला

औरंगाबाद: हर्सूल परिसरातील राजे संभाजी नगरमध्ये चोरट्यांनी गुरुवारी मध्यरात्री अडीच तास धुमाकूळ घालत ६ कुलूपबंद घरे फोडली. चोरट्यांनी रेकी करून ही घरे फोडली असावीत. या घटनेत साडेसात तोळ्यांचे सुवर्ण दागिने, १०० ग्रॅम चांदीची दागिने आणि १ लाख ४५ हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेने परिसरात चोरट्यांची दहशत पसरली. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

दिनेश रमेश म्हस्के आणि त्यांची पत्नी शिक्षक आहेत. खामगाव (ता. फुलंब्री) येथे त्यांनी घर बांधले. घरगुती कामासाठी पती-पत्नी १५ दिवसांपासून गावाला गेले आहेत. त्यांच्या घराला कुलूप असल्याची संधी साधून चोरट्यांनी गुरुवारी रात्री २:३१ वाजताच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडले. लाकडी कपाट तोडून त्यातील अडीच तोळ्याची सोन्याची पोत, सोन्याचा पत्ता, बाळ्या, चांदीची चेन आणि बाळाची चेन, रोख ३ हजार रुपये चोरून नेले.

==========

खासगी नोकरदार तुषार एकनाथ गाजरे हे वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे निमखेडी बुद्रूक (ता. मुक्ताईनगर,जि. जळगाव) येथे सहकुटुंब गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. कपाटातील ५ ग्रॅम आणि २ ग्रॅम सोन्याच्या दोन अंगठ्या, ३ तोळे सोन्याची पोत, ५ ग्रॅमच्या कानातील रिंग, ६२ ग्रॅमचे चांदीचे पायल आणि कमरेचा छल्ला पळविला.

गाजरे यांच्या घराशेजारीच ज्ञानेश्वर कौसाराम दांगोडे हे पोस्टमन भाड्याने राहतात. दोन दिवसांपूर्वी दांगोडे कुटुंब अंधारी (ता. सिल्लोड) येथे गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले; मात्र त्यांच्या घरात किमती ऐवज आणि रक्कम नव्हती. यानंतर चोरटे समोरील संजय भीमराव शिंदे यांच्या घराकडे गेले. शिंदे हे पत्नी, आई, दोन मुले, मुलीसह गच्चीवर झोपले होते. त्यांनी लोखंडी गेटला कुलूप लावले नव्हते. आतील दरवाजाला फक्त बाहेरून कडी लावली होती. रात्री तीन ते सव्वा तीन वाजताच्या सुमारास चोरटे सहज घरात घुसले. खोलीतील लोखंडी कपाट त्यांनी उचकटले. लॉकर तोडून त्यातील २ ग्रॅमची पोत, ३ ग्रॅमचे कानातील झुंबर, १ लाख १२ हजार ४०० रुपये रोख चोरून नेले. चोरट्यांनी बेंटेक्स दागिन्यांना हात लावला नाही.

पाचव्या घटनेत चोरट्यांनी आईसाहेब चौकाजवळील रामेश्वर रुस्तूम जाधव यांचे घर फोडून ३० हजाराची रोकड आणि ३ ग्राम सोन्याचे दागिने पळविले. याच कॉलनीतील शेजुळ यांचे घर चोरट्यानी फोडले; मात्र या घटनेत चोरीला काही गेले नाही, असे पोलिसांनी सांगितले.

==============

चौकट

वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

राजे संभाजी नगरातील ६ घरे फोडल्याचे कळताच पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, सहायक आयुक्त निशिकांत भुजबळ, पोलीस निरीक्षक सचिन इंगोले, फौजदार रफिक शेख, सोन्ने, शिवाजी शिंदे, शेख शकिल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

=============

श्वान पथक, अंगुली मुद्रा पथकाला पाचारण

पोलिसांनी श्वान पथक आणि अंगुली मुद्रा पथकाला घटनास्थळी पाचारण केले; मात्र श्वान पहिल्या घरापासून निघाला आणि शेवटचे घर फोडलेल्या एका हॉटेलपर्यंत गेला आणि तेथेच घुटमळला. अंगुली मुद्रा पथकाने काही नमुने गोळा केले.

===================

चोरट्यांनी सोबत नेले कुलूप

चोरट्यांनी ६ घरे फोडली. यापैकी ५ घरांची कुलपे चोरट्यांनी सोबत नेल्याचे घरमालकांनी सांगितले.

===============

चोरट्याला पाहून महिला ओरडली

हॉटेलचालक शिंदे यांच्या घरात चोर चोरी करत होते. यावेळी त्यांची नातेवाईक महिला पाणी पिण्यासाठी गच्चीवरून खाली आल्या. तेव्हा आतील खोलीतील लाईट सुरू होता. त्या खोलीत डोकावल्या असता दोन चोरटे तेथे होते. त्यांना पाहून त्या ओरडताच चोरट्यांनी धूम ठोकली.

==== ============

Web Title: Thieves roam in Raje Sambhaji Colony;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.