छत्रपती संभाजीनगर: विधान सभेत विरोधीपक्षनेतेपद द्यायचे अथवा नाही, याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असतो. विरोधीपक्षनेतेपद देण्यासाठीही संख्याबळ लागते. राज्यातील एकाही विरोधीपक्षाकडे पुरसे आमदार नाही. यामुळे कोणत्याच पक्षाचा विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. यामुळे आगामी विधानसभेचे अधिवेशन हे विरोधीपक्षनेत्याविनाच होणार असल्याचे राज्याचे सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले दिले.
राज्य विधानसभेच्या आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेनेकडून विरोधीपक्षनेतेपदासाठी दावा केला जात आहे. आदित्य ठाकरे आणि भास्कर जाधव यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू असल्याकडे मंत्री संजय शिरसाट यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आदित्य ठाकरे विरोधी पक्षनेता होऊच शकत नाही.कारण विरोधीपक्षनेते पदासाठी त्यांच्याकडे संख्याबळच नाही.
शिंदेसेनेचे नेते तथा तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मंजूर केलेल्या निविदा थांबविण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे, याबद्दल खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे, याकडे कसे पाहता असे विचारले असता मंत्री शिरसाट म्हणाले की, तानाजी सावंत आमचे असले तरी कामाला मान्यता देण्याचे अधिकार आयुक्तांना असतात. यात काही चुकीचे झाले असेल त्याची चौकशी झाली पाहिजे. मात्र यामुळे युतीमध्ये काही बेबनाव असल्याचा अर्थ काढण्याची काही लोकांना सवयच झाली आहे.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सरकार वाचवत असल्याची टीका संजय राऊत यांनी केली, याकडे लक्ष वेधले असता शिरसाट म्हणाले की, कोर्टाने कोकाटे यांना शिक्षा दिली असली तरी त्यांनी शिक्षेला वरिष्ठ कोर्टात आव्हान दिले आहे. संजय राऊतही तीन महिने जेलमध्ये गेले होते. त्यांना बेल मिळाली याच अर्थ आम्ही त्यांना वाचवले होते का? राऊतांनी ते बेलवर आहेत याचे भान ठेवावे,असा खोचक सल्ला दिला.