पैठण तालुक्यातील ३५ गावे होणार गुलाबी
By Admin | Updated: November 18, 2014 01:11 IST2014-11-18T00:54:25+5:302014-11-18T01:11:48+5:30
संजय जाधव, पैठण गुलाबी शहर म्हणून जयपूरची ओळख आहे. अगदी त्याच धर्तीवर पैठण तालुक्यातील ३५ गावे गुलाबी गावे म्हणून ओळखली जाणार आहेत

पैठण तालुक्यातील ३५ गावे होणार गुलाबी
संजय जाधव, पैठण
गुलाबी शहर म्हणून जयपूरची ओळख आहे. अगदी त्याच धर्तीवर पैठण तालुक्यातील ३५ गावे गुलाबी गावे म्हणून ओळखली जाणार आहेत. पंचायत समितीने ३५ ग्रामपचायतींची आयएसओ मानांकनासाठी निवड केली असून या ग्रामपंचायतीतून मिळणाऱ्या सेवा सुविधेत आमूलाग्र बदल केले आहेत. पर्यावरणाच्या जतनासह अत्याधुनिक यंत्रणेचा वापर व नागरी सुविधा ग्रामपंचायतीमार्फत देत या प्रक्रियेत लोकसहभाग वाढविण्यात येत आहे.
विशेष म्हणजे या ग्रामपंचायतींमध्ये योजना राबविण्याबाबत स्पर्धा निर्माण करण्यात पंचायत समितीला यश आले आहे. त्यामुळे लवकरच ग्रामपंचायतीत मोठा कायापालट झालेला दिसून येणार आहे.
तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतीस एकसारखा गुलाबी रंग देण्यात येणार असून सर्व साहित्य गुलाबी रंगाचेच वापरण्यात येणार असल्याचे सहायक गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी सांगितले.
जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पैठणचे गटविकास अधिकारी उल्हास सोमवंशी, सहायक गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी पुढाकार घेतला. सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य यांच्या बैठका घेऊन त्यांना प्रेरित केले.
असा होणार बदल
संपूर्ण कामकाजाचे संगणकीकरण करणे, गावात व्यायामशाळा उभारणे, कचरा व्यवस्थापण करणे, ग्रामपंचायतचे रेकॉर्ड अभिलेखाचे संगणकीय अपडेट करणे, कार्यालयात सीसीटीव्ही, स्ट्रीट लाईट, हायमास्ट बसविणे, गरोदर महिलांसाठी माहेरघर योजना राबविणे, जन्म-मृत्यू , वाढदिवस दर्शविणारा शुभेच्छा फलग गावात लावणे, लहान मुलांसाठी मैदान उपलब्ध करून देणे, वृक्ष लागवड करणे, गावात १०० टक्के शौचालय बांधणे, प्रत्येक घरावर घरमालकाच्या नावाची पाटी लावणे आदी उपक्रम राबविले जातील.
माहेरघर योजना
सुदृढ बालक जन्मास यावा म्हणून गरोदर महिलेस दुपारच्या समयी विश्रांतीची गरज असते. यासाठी गावात स्वतंत्र सर्व सोयीने युक्त असलेला कक्ष निर्माण करण्यात येणार असून तेथे महिलांना आरोग्यविषयक सुविधा देण्यात येतील असे सहायक गटविकास अधिकारी उषा मोरे यांनी सांगितले.
आडुळ, बाभूळगाव, बिडकीन, बोकुडजळगाव, चितेगाव, धनगाव, ढाकेफळ, इसारवाडी, ईमामपूर, हार्षी, कारकीन, कातपूर, कौडगाव, कोलिबोडखा, कृष्णापूर, मुधळवाडी, मुलानीवाडगाव, नांदलगाव, पांगरा, पिंपळवाडी, रजापूर, सोमपूरी, शेकटा, वाहेगाव, फारोळा, रांजणगावखुरी, कापूसवाडी, बालानगर, तांडा बु., लोहगाव, ७४ जळगाव, जांभळी, कडेठाण, म्हारोळा, दिन्नापूर या ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे.
जपान येथे बसविण्यात आलेल्या कचराकुंडी प्रमाणे १० फूट उंचीची सिमेंटची कचराकुंडी गावात बसविण्यात येणार असून या कचराकुंडीस खालच्या बाजूस आऊटलेट राहणार आहे. यामुळे जनावरे हा कचरा पसरविण्याचा धोका टळणार आहे