सीआरपीएफच्या ११ कंपन्या येणार
By Admin | Updated: October 3, 2014 00:39 IST2014-10-03T00:32:19+5:302014-10-03T00:39:14+5:30
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.

सीआरपीएफच्या ११ कंपन्या येणार
औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. जिल्ह्याच्या सीमांवर दहा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. निवडणूक काळात जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. त्यासाठी केंद्रीय राखीव दलाच्या ११ कंपन्यांची कुमकही जिल्ह्यास मिळणार आहे.
जिल्हाधिकारी विक्रमकुमार, पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह, पोलीस अधीक्षक अनिल कुंभारे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. केंद्रीय निवडणूक निरीक्षक मनोजकुमार, उपेंद्रनाथ बोरा आणि एम. के. अयप्पा यांचीही उपस्थिती होती. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुबार नावे आहेत. त्यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दुबार नावांची बुथवाईज स्वतंत्र यादी करण्यात आली आहे. ही यादी प्रत्येक बुथवर उपलब्ध असेल.
यादीतील कुणी मतदानासाठी आला तर त्याच्याकडे दुसरा एखादा ओळखीचा पुरावा मागितला जाईल. बोगस मतदान करीत आहे, असे आढळल्यास लगेच त्याला अटक करून कारवाई करण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.
उमेदवारांच्या गर्दीमुळे ईव्हीएमचा तुटवडा
जिल्ह्यात सहा मतदारसंघांत १५ पेक्षा जास्त उमेदवार रिंगणात उरल्यामुळे तेथे दोन- दोन इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (ईव्हीएम) चा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे ईव्हीएमचा तुटवडा जाणवत आहे. आणखी दोन हजार ईव्हीएम लागणार आहेत. आयोगाकडे तशी मागणी केली आहे, असे जिल्हाधिकारी विक्रमकुमार म्हणाले.