वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ
By Admin | Updated: August 25, 2014 01:37 IST2014-08-25T01:19:43+5:302014-08-25T01:37:25+5:30
उस्मानाबाद : शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये शासनाने

वृद्ध कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ
उस्मानाबाद : शासनाच्या वतीने वृद्ध साहित्यिक व कलावंत यांना मानधन ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानामध्ये शासनाने घसघशित वाढ केली आहे. पूर्वी राष्ट्रीय कलावंताला प्रतिमाह १ हजार ४०० रूपये अनुदान मिळत होते. ते आता २ हजार १०० रूपये करण्यात आले आहे. त्यामुळे एका लाभार्थ्याला आता वर्षाकाठी १६ हजार ८०० ऐवजी २५ हजार २०० रूपये मानधन मिळणार आहे. अशाच पद्धतीने राज्यस्तरीय आणि स्थानिक कलावंतांच्या मानधनात वाढ झाली आहे.
कलावंत मानधन योजनेअंतर्गत २००९ च्या शासन निर्णयानुसारच लाभार्थ्यांना मानधन दिले जात होते. दिवसेंदिवस महागई वाढत चालल्याने मानधनाच्या रक्कमेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी साहित्यिक व कलावंतांतून होत होती. याबाबत शासनाकडे वारंवार पाठपुरवाही करण्यात येत होता. ही बाब लक्षात घेवून शासनाने कलावंतांच्या मानधनामध्ये तब्बल दीड पटीने वाढ केली आहे. सदरील आदेश २२ आॅगस्ट रोजी निर्गमित करण्यात आले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे कलावंततांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. (प्रतिनिधी)
२००९ च्या निर्णयानुसार राष्ट्रीय कलावंतांना प्रतिमाह १४०० रूपये या प्रमाणे वर्षाकाठी १६ हजार ८०० रूपये इतके मानधन मिळत होते. आता ते प्रतिमाह २ हजार १०० रूपये या प्रमाणे २५ हजार २०० रूपये इतकी रक्कम मिळणार आहे. राज्यस्तरीय कलावंतांच्या मानधनातही वाढ करण्यात आली आहे. या कलावंतांना आता प्रतिमाह १ हजार २०० वरून १ हजार ८०० रूपये मानधन मिळेल. तर स्थानिक कलावंतांना आता १ हजार रूपयांवर १ हजार ५०० रूपये मिळणार आहेत.