शेड आहे, संरक्षक भिंतच नाही; अनेक ठिकाणी सुविधांची वाणवा
By Admin | Updated: December 16, 2015 23:12 IST2015-12-16T23:02:00+5:302015-12-16T23:12:13+5:30
हिंगोली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. परंतु मागणी करूनही सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत.

शेड आहे, संरक्षक भिंतच नाही; अनेक ठिकाणी सुविधांची वाणवा
हिंगोली : जिल्हाभरात अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा आहे. परंतु मागणी करूनही सोयी-सुविधा पुरविल्या गेलेल्या नाहीत.
करंजीत सुविधांचा अभाव
करंजी : वसमत तालुक्यातील करंजी येथे हिंदू व मुस्लिम बांधवासाठी दोन स्वतंत्र स्मशानभूमी आहेत. मात्र दोन्ही स्मशानभूमींची दुरवस्था झाली आहे. सध्या स्मशानभूमीला संरक्षक भिंत नसल्यामुळे याठिकाणी रात्रीच्या वेळी प्राणी आपले निवारा करून राहत आहेत. पावसाळ्यामध्ये एखादा ग्रामस्थ मरण पावला तर दहन विधीसाठी साधे टिनपत्रेसुद्धा नाहीत. अनेकवेळा स्मशानभूमीला संरक्षक भिंतीची मागणी करूनही अद्याप काम झाले नाही. करंजी परिसरातील इतर गावांमध्येही स्मशानभूमीत मुलभूत सोयीसुविधांची समस्या आहे.
कडोळीत एकच जागा
कडोळी : येथे एकच स्मशानभूमी शेड असून २००३-२००४ मध्ये बांधकाम पूर्ण झाले आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायचे झाल्यास खाली करावे लागते. कारण त्यामधील सर्व बेड उखडले आहे. शेडची कुठल्याही प्रकारे दुरूस्ती झालेली नाही. गावात ५ हजार लोकसंख्या अजून दोन स्मशानभूमी आवश्यक आहेत. एकाच दिवशी जर दोन मृत्यू झाले तर एकाच शेडखाली अंत्यसंस्कार करावे लागतात. तेथे जाण्यास रस्ताही नसून विजेची व्यवस्था ग्रा.पं.करणार आहे. पावसाळ्यात अडचणी वाढतात.
साटंब्यात अडचण
भांडेगाव : भांडेगाव येथे स्मशानभूमीची मोठी अडचण होती. परंतु आता येथे स्वच्छता करून स्मशानभूमीची अडचण दूर केली. तर साटंबा येथेही स्मशानभूमीला कुंपन केलेले आहे. या ठिकाणी शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यविधीस अडचण येते. साटंबा येथे हिंदू, मुस्लिम, बौद्ध, मातंग अशा वेगवेगळ्या समाजाच्या स्मशानभूमीसाठी वेगळी व्यवस्था आहे. परंतु एकाही ठिकाणी पावसाळ्यात अंत्यविधी करण्यास सोय नाही.
तोंडापुरात समस्यांचा विळखा
वारंगाफाटा : तोंडापूर येथील तिन्ही स्मशानभूमी चहूबाजूने समस्यांच्या विळख्यात अडकलेल्या आहेत. एक स्मशानभूमी ही अर्धवट बांधलेली आहे. एक मुस्लिम व एक बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहेत. सदरील स्मशानभूमींना तारकुंपन व संरक्षक भिंत सोडली तर कुठल्याही प्रकारच्या आवश्यक सोयीसुविधा नाहीत. सुशोभिकरणासाठी शासनाकडून अद्याप अनुदान खर्च करण्यात आलेला नाही, अशी माहिती ग्रामस्थांनी दिली.
चिखलातून जाते वाट
डोंगरकडा : गावाची लोकसंख्या दहा हजारावर असून सर्व जातीधर्माच्या वेगवेगळ्या स्मशानभूमी आहेत. पण गावातील एकाही स्मशानभूमीला शेड पक्का रस्ता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. पावसाळ्यात तर अंत्यविधीला फार मोठी समस्या येते.
बौद्ध स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी पावसाळ्यात चिखलातून वाट काढावी लागते. गावंडे व अडकिणे गल्लीच्या स्मशानभूमीला लोकसहभागातून निधी गोळा करून तारकुंपन करण्यात आलेले आहे. डोंगरकडा फाटा येथे एकच स्मशानभूमी असून शेड, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही.
शिरडला सुविधा नाहीत
शिरडशहापूर : येथे तीन स्मशानभूमी असून दोन समाजांसाठी मात्र कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. आहे त्या स्मशानभूमीतही कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत.
गावची स्मशानभूमी ही नदीपलीकडे आहे. जैन समाजाच्या स्मशानभूमीत नुसते शेड उभारलेले असून तारांचे कुंपन आहे. दलितवस्ती स्मशानभूमीत अर्धवट संरक्षक भिंतीचे काम आमदार फंडातून झाले आहे. गौडगल्लीच्या स्मशानभूमीची संरक्षक भिंत नुकतीच बांधली आहे. मराठा व लिंगायत समाजाला स्मशानभूमीसाठी जागाच नसल्याने उघड्यावर अथवा शेतात अंत्यसंस्कार करण्यात येत आहे. सर्वच स्मशानभूमीला जाण्यास चांगला रस्ता नाही. साधे हातपंप, वीज व्यवस्था नसल्यामुळे रात्री अंधाराचा सामना करावा लागतो.